आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान
esakal October 15, 2025 07:45 PM

गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा नेता असलेल्या सोनू उर्फ भूपती याच्यासह ६१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. मुख्यमंत्री फडणवी यांच्या उपस्थितीत या आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून माओवादाच्या विरोधात लढाई सुरु झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात माओवाद्यांपासून मुक्त भारत योजना सुरू झाली. त्याअंतर्गत महाराष्ट्रात गेले १० वर्षे आम्ही सातत्यानं माओवाद्यांच्याविरुद्ध प्रचंड लढा उभारला. आज तो लढा निर्णायक अशा पद्धतीनं समाप्तीकडं चालला आहे. आज सोनू उर्फ भूपती यांच्यासह ६१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय.

सोनू उर्फ भूपती हा संपूर्ण दंडकारण्यात जो माओवादाचा उदय झाला, अहेरी दलम, सिरोंचा दलम, चामोर्ची दलम असेल किंवा टिपागड दलम जे तयार झाले त्यातून शसस्त्र तयार झाली त्याचा सूत्रधार, आधार हा भूपती होता. आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे आधारच संपला. मागच्या आत्मसमर्पणामुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद संपवलेला, दक्षिण गडचिरोलीतला माओवाद जवळपास संपवलाय. आता फक्त कंपनी १० याचे बोटावर मोजण्याइतके लोक बाकी असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

आम्हाला विश्वास आहे की, उरलेले माओवादीही समर्पण करतील. गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलाय. गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेलं त्याआधीच महाराष्ट्रानं ते पूर्ण केलंय. आमच्या ३६० आणि पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी वरिष्ठांच्या नेतृत्वात चांगली मोहिम राबवली. वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करून, निगोशिएशन करून, जेरीस आणून भूपतीसारख्या मोठ्या मेंबरला याठिकाणी केवळ समर्पणाला तयार केलं नाही तर त्यानं माओवाद संपल्याचंही जाहीर केलं. मोठ्या प्रमाणात छत्तीसगढमध्येही आत्मसर्पण होईल असं आम्हाला त्याच्या बोलण्यातून जाणवल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सरेंडर करण्याची अट घातली होती का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसमोर सरेंडर करू असं माओवादी म्हणाले होते. तेव्हा माझ्याशी ज्यावेळी वरिष्ठांनी चर्चा केली. मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की जंगलात जरी बोलावलं तरी मी यायला तयार आहे. पण जंगलाऐवजी त्यांना इथं आणून आपल्या दलाने समर्पण करायला लावलं. म्हणूनच मी सगळे कार्यक्रम रद्द करून इकडे आलो. शेवटी पोलिसांच्या विश्वासाचाही हा मुद्दा होता.

शहरी नक्षलवादाचं आव्हान आता आपल्यापुढे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. ते म्हणाले की, नक्षलवाद संपत चाललाय आणि आता पुढचं आव्हान शहरी नक्षलवादाचं आहे. शहरी नक्षलवादी, माओवादी भारताचं संविधान मानत नाहीत. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नष्ट करून अराजकतेचं राज्य करण्यासाठी तरुणाईच्या डोक्यात त्यांचे विचार घालतायत. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी २०१८मध्ये शहरी नक्षलवाद्यांना अटक केली. आपण ज्या नेत्यांना अटक केले त्यामुळे लॉजिस्टिक सपोर्ट माओवाद्यांना मिळत होता तो बंद झाला. यामुळेच हे आत्मसमर्पण शक्य झालं. येत्या काळातली लढाई संविधान विरुद्ध शहरी माओवादी अशी आहे. संविधानच जिंकेल, अराजकतावाद्यांना पराभूत करू हा विश्वास व्यक्त करतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.