आयपीलच्या पुढच्या पर्वासाठी खेळाडू खरेदी आणि त्यांना कायम ठेवण्याबाबत फ्रँचायझींमध्ये चर्चा सुरू आहे. आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संजू सॅमसन खूपच चर्चेत आहे. त्याचं नाव दोन चार फ्रेंचायझीसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे संजू सॅमनस राजस्थान रॉयल्सकडून खेळणार की दुसर्या फ्रेंचायझीकडून याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ट्रेड विंडोचा पर्याय उपलब्ध असल्याने बरंच काही घडण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटला स्पष्ट सांगितलं आहे की तो पुढच्या पर्वात संघाचा भाग होऊ इच्छित नाही. यासाठी फ्रेंचायझीपुढे ट्रेड विंडोचा किंवा लिलावात रिलीज करण्याचा पर्याय असणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने संजू सॅमसनला संघात घेण्याची इच्छा दर्शवली आहे. पण ही डील वाटते तितकी सोपी नाही. कारण दिल्ली कॅपिटल्सला यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते.
दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीची संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. कारण विकेटकीपर आणि कर्णधार अशा दोन्ही बाजू स्पष्ट होतील. मिडिया रिपोर्टनुसार, दिल्ली संघ आयपीएल ट्रेड विंडोच्या माध्यमातून संजू सॅमसनसाठी फासे टाकणार आहे. पण या करारासाठी कोणत्या खेळाडूला सोडवं लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे घोडं अडलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडू आहेत. पण हे खेळाडू संजू सॅमसनची उणीव भरून काढतील का? असा प्रश्न राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसमोर आहे. त्यामुळे जर संजू सॅमसनला सोडायचं झालं तर कोणत्या खेळाडूसाठी डाव लावतील हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये बरीच चर्चा सुरु झाली आहे.
आयपीएल 2025 पर्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. त्यात संजू सॅमसन दुखापतीमुळे आत बाहेर राहिला. त्यात ओपनिंगसाठी फ्रेंचायझीला उदयोमुख चेहरा सापडला आहे. वैभव सूर्यवंशीने मागच्या पर्वात आक्रमक खेळी करत आपला हिसका दाखवला आहे. त्यात अंडर 19 क्रिकेटमध्ये त्याने फॉर्मही सिद्ध केला आहे. त्यामुळे संजू ऐवजी एखादा अष्टपैलू खेळाडू संघात घेण्यासाठी राजस्थानचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोलकाता नाईट रायडर्सने कराराची ऑफर दिली आहे. त्यामुळे दिल्लीही एका चांगल्या खेळाडूच्या शोधात आहे.