लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं विधान केल्यानं वादात अडकलेल्या राज्याच्या सहकारमंत्र्यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलंय. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जागी इंद्रनील नाईक यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आलीय. अजित पवार यांची वरळीत जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांनी घोषणा केली. काही दिवसांपूर्वी नागपुरात पक्षाच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जिल्ह्यात येतात अशी टीका केली होती.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलंय. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत पालकमंत्रीपद सोडलं. त्यांच्या जागी इंद्रनील नाईक गोंदियाचे पालकमंत्री असतील. एका बाजूला पालकमंत्रीपदासाठी नाराजी, वाद सुरू असताना बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रीपद सोडल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थितबाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालंय. त्यामुळे लांबचा प्रवास करण्यास त्रास होत असल्याचं कारण त्यांनी पालकमंत्रीपद सोडताना दिलंय. नागपुरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे कान टोचले होते. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेनंतर बाबासाहेब पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रीपद सोडल्याचं सांगितलं. त्याच्याऐवजी इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाचं पालकमंत्रीपद सोपवलं. इंद्रनील नाईक हे विदर्भातले मंत्री आहेत. गोंदियाला जाणे त्यांच्यासाठी सोयीचे ठरू शकते म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याची माहिती समजते.