98335
दिविजा आश्रमातर्फे विद्यार्थ्यांना ‘उटणे’
तळेरे, ता. १४ : आजच्या आधुनिक युगात तरुण पिढी आधुनिकीकरणाकडे वळत आहे. दिवाळीला सुगंधी उटणे वापरणे विसरत आहे. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा विसर पडू नये, यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी देवगड, कणकवली व मालवण तालुक्यांतील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत उटणे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबवला. दिवाळीपूर्वीच आजी-आजोबांनी या मुलांना सुगंधी भेट दिली. दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी आपल्या शालेय नातवंडांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पारंपरिक उटणे स्वतः बनवून विद्यार्थ्यांना वाटले. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी आजी-आजोबांचे हे आशीर्वाद कणकवली, देवगड व मालवण तालुक्यांतील जवळजवळ २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले.