आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हे 2 संघ आमनेसामने होते. इंग्लंडला हा सामना जिंकून विजयी चौकार पूर्ण करण्यासह उपांत्य फेरीसाठी दावा मजबूत करण्याची संधी होती. तर दुसऱ्या बाजूला सलग 3 सामने गमावणाऱ्या पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चौथ्या मॅचमध्ये विजयी होणं बंधनकारक होतं. त्यामुळे इंग्लंड विजयी चौकार लगावणार की पाकिस्तान पराभवाच्या हॅटट्रिकनंतर विजयाचं खातं उघडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र सामन्याचा निकाल भलताच लागला. ना पाकिस्तानचा पराभव झाला ना इंग्लंड जिंकली.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला सामन्याचा पावसामुळे निकाल लागू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता विजयासाठी पुढील सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 31 ओव्हरचा होणार हे निश्चित झालं. इंग्लंडने 9 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर पावसाने पाकिस्तानच्या बॅटिंग दरम्यान पुन्हा एन्ट्री घेतली. त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही.
इंग्लंडने 25 ओव्हरपर्यंत 7 विकेट्स गमावून 79 धावा केल्या होत्या. तेव्हा पावसाने शिरकाव केला. त्यामुळे सामनातील 19 षटकं कमी करण्यात आली. त्यामुळे 31 ओव्हची मॅच होणार हे स्पष्ट झालं. इंग्लंडने 133 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने विजयी धावांच्या प्रत्युत्तरात चांगली सुरुवात केली. पाकिस्तानने 6.4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 34 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तान जिंकेल असं चित्र होतं. मात्र पावसाला पाकिस्तानचा विजय पाहवेना. पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा खेळ सुरुच होऊ शकला नाही. परिणामी सामना रद्द करावा लागला. अशाप्रकारे या स्पर्धेतील सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.
त्याआधी 14 ऑक्टोबर रोजी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 258 धावा केल्या. मात्र पावसामुळे दुसऱ्या डावाला सुरुवात होऊ शकली नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला.
दरम्यान स्पर्धेतील 17 व्या सामन्यात गुरुवारी 16 ऑक्टोबरला गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. बांगलादेश या सामन्यात ऑस्ट्रेलियाला रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.