ठाणे स्टेशनपरिसरात रिक्षा, फेरीवाल्यांची गर्दी
esakal October 16, 2025 04:45 PM

स्थानक परिसरात फेरीवाल्यांची गर्दी
पदपथ, रस्त्यांवर कब्जा; प्रवाशांची अडवणूक

ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) : ठाणे रेल्वेस्थानक हे मुंबई उपनगरांसह, ट्रान्स हार्बर, राज्य, परराज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथून रोज सहा ते सात लाख प्रवासी वाहतूक होते; मात्र हा परिसर सध्या फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. दिवाळीचे साहित्य विकणाऱ्यांनी तर या परिसराला वेढाच घातला असून, त्यांचा वेढा भेदून प्रवाशांना रेल्वेस्थानक गाठणे आणि बाहेर पडणे कठीण होत आहे. परिसरात मुंबई उच्च न्यायालयाने १५० मीटर अंतराच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केलेली असतानाही या आदेशाला डावलून फेरीवाले थेट स्थानकाच्या प्रवेश द्वारावर ठाण मांडून बसले आहेत. स्थानकाबाहेरील पुलावरसुद्धा ताबा मिळवला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाला मोठे महत्त्व आहे. रोज सात ते आठ लाख प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही बाजूला प्रवाशांची मोठी गर्दी असते; मात्र सध्या दोन्ही बाजूचे परिसर बेशिस्त रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. प्रवासी घेण्यासाठी रिक्षावाले गेटवर आणि पुलावर उभे राहतात. फळे, भाजी, स्टेशनरी, कपडेविक्री करणारे फेरीवाले परिसरातील पदपथांवर ठाण मांडून बसले आहेत. आतातर दिवाळीचे साहित्य विकणाऱ्यांनी परिसर ताब्यातच घेतला असून, पालिकेची दिखाऊ कारवाईनंतर पुन्हा हे फेरीवाले परिसराचा ताबा घेतात.

सिडको स्थानकाला विळखा
रेल्वेस्थानकानजीक असलेल्या सिडको बसस्थानक येथून रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेस्थानकात ये-जा करतात, परंतु या ठिकाणीसुद्धा फेरीवाल्यांनी कब्जा केलेला दिसतो. बस आगारासोबतच स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बस्तान मांडून बसले आहेत. रिक्षा, दुचाकी, इतर खासगी वाहनांची वाहतूकसुद्धा येथूनच सुरू असते. येथील फुल बाजारातसुद्धा सतत गर्दी असते. त्यामुळे स्थानकाकडे जाणे कठीण होते. भविष्यात एखादी अफवा पसरली, दुर्घटना झाली तर मोठी. चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे.

एसटी आगाराची कोंडी
स्थानकाबाहेर येताच एसटी आगार आहे. येथेही लाखोंच्या संख्येने विविध भागातील प्रवासी येतात, मात्र हे आगारसुद्धा फेरीवाल्यांच्या कब्जात आहे. स्थानकाला लागून असलेल्या आगाराच्या प्रवेशद्वारावावर फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे एसटीला जाण्या-येण्याचा मार्गदेखील मिळत नाही.

रिक्षस्ा स्टॅन्डचे अडथळे
बी केबिन, गावदेवी मैदान, अलोक हॉटेल आणि सॅटिस पुलाखाली अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड असल्याने येथे शेअरिंग रिक्षाच्या मोठ्या रांगा असतात. त्यामुळे अर्धा रस्ता रांगेने व्यापला जात असल्याने रस्त्यावर मोठी कोंडी होत असते. या रस्त्यावरुन चालण्यासाठी प्रवाशांना जागा मिळत नाही.

पिवळे पट्टे गायब
स्थानक परिसरात १५० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे, मात्र हा नियम सांगणारे पिवळे पट्टेच स्थानक परिसरातून गायब झाले आहेत. त्याकडे रेल्वे आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी उच्च न्यायालयाच्या आदेशाचीदेखील पायमल्ली होताना दिसते.

पालिकेची कारवाई
स्थानक परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या वस्तू विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी गर्दी केली असल्याने भाजपचे मा. शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या तक्रारीची दखल घेत पालिकेने स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे, मात्र पालिकेकडून अशी कारवाई अधूनमधून होत असताना काही वेळातच हे फेरीवाले पुन्हा येथे ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रशासनाकडून यावर कायमचा तोडगा काढला जाणे अपेक्षित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.