चाकण, ता. १५ : येथील नाणेकरवाडी येथील सराईत गुंड रजित येरकर (वय २१) याच्यावर कनेरसर (ता. खेड) येथील एकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने नाणेकरवाडीत एकावर कोयत्याने हल्ला केला होता त्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन रजित येरकर याची नाणेकरवाडी, मेदनकरवाडी परिसरातून धिंड काढली. त्याला रस्त्यावर नागरिकांसमक्ष फिरवले. या सराईत गुंडाची या परिसरात मोठी दहशत आहे. तो अनेक गुन्हे करत आहे. त्यामुळे परिसरातील त्याच्या दहशतीची भीती कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी त्याची हातात बेड्या घालून धिंड काढली.
चाकण येथील जवळचा औद्योगिक परिसर तसेच वाढती लोकसंख्या परराज्यातील आलेला कामगार, राज्यातील आलेला कामगार इतर लोक यामुळे येथील लोकसंख्या अगदी दोन लाखांच्या पुढे गेलेली आहे. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात बकालीकरण झालेले आहे. त्यामुळे येथे कोण राहतो काय धंदे करतो हे कोणालाच कळत नाही. येथे २५ हजारांच्या वर भाड्याच्या खोल्या आहेत तसेच सदनिका आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात राज्यातील तसेच परराज्यातील कामगार, नागरिक राहतात. परराज्यातील अनेक सराईत गुंड त्या राज्यात गुन्हे करतात आणि येथे लपून बसतात. येथून गुन्हेगारीची चक्रे फिरवतात. त्यामुळे येथील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक गुंडांच्या टोळ्या आहेत. ते विविध प्रकारचे गुन्हे करतात जामिनावर सुटतात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा ते गुन्हे करतात. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीच्या टोळ्या आहेत ते अगदी खून आदी प्रकार करतात. अल्पवयीन असल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक तेवढा बसत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ही गुन्हेगारी पोलिसांना तसेच नागरिकांना कामगारांना इतर व्यावसायिकांना डोकेदुखी ठरत आहे, हे भयानक वास्तव आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही गुन्हेगारावर मकोका, तडीपार, यासारख्या कारवाया केल्या आहेत. नाणेकरवाडीत सराईत गुंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो जामिनावर सुटलेला होता त्या रजित येरकर या तरुण गुन्हेगाराला त्या परिसरात त्याच्या हातात बेड्या घालून फिरविले. त्यामुळे परिसरातील नागरिक, कामगार, व्यावसायिक यांच्यात त्याच्याबाबत असलेली दहशत कमी झाली. चाकण येथील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे तपास पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.
- संजय सोळंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण (ता. खेड)