किनारपट्टीच्या संरक्षणासाठी बांबूला पसंती
सहा महिन्यांत एक लाख १९ हजार ५३१ रोपांची लागवड पूर्ण
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा हा समुद्रकिनारी वसला असून, येथे नद्या, डोंगरद-याही आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीविताचे नुकसान होते. किनारी भागात बांबूची लागवड किनारपट्टीचे संरक्षण, मातीची धूप कमी करणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळेच रायगड जिल्ह्यात हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षातील सहा महिन्यांत एक लाख १९ हजार ५३१ बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूची मदत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरत आहे. गेल्या काही वर्षांत रायगड जिल्ह्यातील किनारी भागासह डोंगराळ भागत असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने पुराचा धोका वाढला आहे. पुराच्या धोक्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला मूळ अधिवास सोडून इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळेच जिल्ह्यात बांबूलागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख १९ हजार ५३१ बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत अलिबाग तालुक्यात पाच हजार ६८, कर्जतमध्ये पाच हजार ३०६, महाड चार हजार ९३०, माणगाव १७ हजार १७४, पेण २९ हजार ५००, पोलादपूर चार हजार ४३७, रोहा २८ हजार ८४०, तळा सात हजार ७५६, उरण १६ हजार ५२० अशा एकूण एक लाख १९ हजार ५३१ बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी लागणारी १० लाख रोपे ही रायगड जिल्ह्यात निर्माण करण्यात आली आहेत.
..............
कोट:
बाबूंची लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल. त्याचबरोबार शेतकऱ्यांनी बांधावर बांबूलागवड केल्यास त्यांना जोड उत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येनी राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे बांबू जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शक्य असेल त्या ठिकाणी बांबूलागवड करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. लवकरच याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील.
-किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
चैकट:
बांबूलागवडीचे फायदे :
१. बांबूची लागवड जमिनीतील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या कमी होतात.
२. बांबू वन्यजीवांसाठी अधिवास आणि अन्न स्रोत निर्माण करते, ज्यामुळे त्यांची संख्या वाढते.
३. बांबूचा वापर बांधकाम, फर्निचर आणि विविध वस्तू बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि आर्थिक विकास साधता येतो.
४. बांबू नैसर्गिक आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे तो पर्यावरणास अनुकूल आहे. बांबूचा वापर प्लॅस्टिक आणि इतर हानिकारक सामग्रीच्या जागी करता येतो.