भारतीय वंशाचे ॲश्ले टेलिस यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
त्यांच्या घरातून हजाराहून अधिक 'टॉप सीक्रेट' कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर चीनच्या अधिकाऱ्यांशी गुप्त बैठकांमध्ये सहभागी झाल्याचा संशयही आहे.
टेलिस हे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आणि परराष्ट्र मंत्रालयात वरिष्ठ सल्लागार होते.
व्हर्जिनियाच्या व्हिएन्ना शहरातील 64 वर्षांचे ॲश्ले टेलिस यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील इस्टर्न डिस्क्ट्रिक्टच्या अटॅर्नी लिंडसे हॅलिगन यांनी दिली.
त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा संबंधी महत्त्वाची माहिती बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
व्हर्जिनियाच्या इस्टर्न डिस्ट्रिक्टमधील अमेरिकन अटॅर्नी कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे.
लिंडसे हॅलिगन म्हणाल्या, "आम्ही अमेरिकन नागरिकांना देश-विदेशात होऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. या प्रकरणात करण्यात आलेले आरोप आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका आहेत."
"या प्रकरणात तथ्य आणि कायदा स्पष्ट आहेत, आणि आम्ही न्याय मिळावा यासाठी त्यांचे पालन करत राहू."
जर या प्रकरणात भारतीय वंशाचे ॲश्ले टेलिस दोषी ठरले, तर त्यांना कमाल दहा वर्षांचा तुरुंगवास आणि 2.5 लाख डॉलर्सपर्यंत दंड होऊ शकतो.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाला दिलेल्या कागदपत्रांनुसार, टेलिस यांच्या घरातून हजाराहून जास्त पानांची अत्यंत गुप्त कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
टेलिस माजी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य होते.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, एफबीआयच्या शपथपत्रात त्यांना परराष्ट्र विभागाचे वेतन न घेणारे सल्लागार आणि संरक्षण मंत्रालयाचे (पेंटागॉन) कंत्राटदार म्हणून सूचीबद्ध केलं आहे.
कागदपत्रांनुसार, त्यांना शनिवारी (11 ऑक्टोबर) अटक करण्यात आली आणि सोमवारी (13 ऑक्टोबर) त्यांच्यावर औपचारिक आरोप ठेवण्यात आले.
टेलिस वॉशिंग्टन येथील थिंक टँक 'कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस'मध्ये सीनियर फेलो देखील आहेत.
टेलिस यांना शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
जे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यावर भाष्य करणार नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
घरात सापडली गोपनीय कागदपत्रंएफबीआयच्या प्रतिज्ञापत्रानुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये टेलिस हे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतींमध्ये जाऊन गुप्त कागदपत्रांची प्रिंट करून बॅगमध्ये घेऊन जाताना दिसले होते.
व्हर्जिनियातील त्यांच्या घराची शनिवारी झडती घेण्यात आली. त्यावेळी तिथे हजाराहून अधिक पानांचे दस्तावेज सापडली, ज्यावर 'टॉप सीक्रेट' आणि 'सीक्रेट' असं लिहिलं होतं.
एफबीआयने न्यायालयात दिलेल्या कागदपत्रांनुसार, "टेलिस गेल्या काही वर्षांत अनेकदा चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटले आहेत. यापैकी एक बैठक 15 सप्टेंबर रोजी व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्समधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली, जिथे ते एक पाकीट घेऊन गेले होते. परंतु, परत येताना त्यांच्याबरोबर ते पाकीट नव्हतं."
प्रतित्रापत्रात म्हटलं आहे की, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण विभागातील त्यांच्या भूमिकेमुळे टेलिस यांच्याकडे 'टॉप सीक्रेट' सुरक्षा परवानगी होती, ज्यामुळे त्यांना संवेदनशील माहितीपर्यंत प्रवेश होता.
चिनी अधिकाऱ्यांची भेटफॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यावर 2023 पासून सुरक्षित ठिकाणाहून गोपनीय कागदपत्रे काढली आणि चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा आरोप आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, टेलिस परराष्ट्र मंत्रालयाचे वेतन न घेणारे वरिष्ठ सल्लागार आणि संरक्षण विभागाच्या ऑफिस ऑफ नेट असेसमेंटचे (सध्याचे 'डिपार्टमेंट ऑफ वॉर') कंत्राटदार होते.
ते भारत आणि दक्षिण आशियाई प्रकरणांचे तज्ज्ञ मानले जातात.
न्यायालयाला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, टेलिस यांनी 2001 मध्ये परराष्ट्र मंत्रालयात काम सुरू केलं. त्यांच्यावर बेकायदेशीररित्या देशाच्या संरक्षणाशी संबंधित माहिती बाळगल्याचा आरोप आहे. त्यांच्या घराची तपासणी केली असता 'टॉप सीक्रेट' आणि 'सिक्रेट' अशी खूण असलेली हजाराहून अधिक कागदपत्रे सापडली.
12 सप्टेंबर रोजी त्यांनी सरकारी कार्यालयातील त्यांच्या एका सहकाऱ्याकडून अनेक गोपनीय कागदपत्रांचे प्रिंट काढून घेतले होते. 25 सप्टेंबरला त्यांनी अमेरिकन वायू दलाशी संबंधित कागदपत्रांच्या प्रिंट्स घेतल्या.
आरोपांनुसार, ते गेल्या काही वर्षांत अनेकवेळा चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटले. सप्टेंबर 2022 मध्ये ते एका रेस्टॉरंटमध्ये चिनी अधिकाऱ्यांना भेटले, तर एप्रिल 2023 मध्ये झालेल्या एका बैठकीत त्यांना इराण-चीन संबंध आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा करताना ऐकलं गेलं.
फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, 2 सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या एका बैठकीत त्यांना चिनी अधिकाऱ्यांकडून एक गिफ्टबॅगही मिळाली होती.
ॲश्ले जे. टेलिस यांनी शिकागो विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएच.डी केली आहे.
त्यांनी त्याच विद्यापीठात एम.ए. ही पूर्ण केलं आहे.
ॲश्ले टेलिस यांनी बी.ए. आणि एम.ए. (अर्थशास्त्र) चं शिक्षण मुंबई विद्यापीठात घेतलं आहे.
टेलिस हे 'कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस' मध्ये टाटा चेअर फॉर स्ट्रॅटेजिक अफेअर्स आणि सिनिअर फेलो आहेत. ते प्रामुख्याने आशिया आणि भारतीय उपखंडाशी संबंधित मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकेच्या परराष्ट्र व संरक्षण धोरणाचे तज्ज्ञ आहेत.
ते अमेरिकन परराष्ट्र विभागात राजकीय प्रकरणांत अंडर सेक्रेटरींचे वरिष्ठ सल्लागार होते. तिथे त्यांनी भारतासोबत नागरी अणू कराराच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत (एनएससी) राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे विशेष सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे.
सरकारी नोकरीपूर्वी, ते आरएएनडी कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ धोरण विश्लेषक आणि आरएएनडी ग्रॅज्युएट स्कूलमध्ये धोरण विश्लेषणाचे प्राध्यापक होते.
ते नॅशनल ब्युरो ऑफ एशियन रिसर्चमध्ये सल्लागार आहेत आणि त्याच्या स्ट्रॅटेजिक एशिया प्रोग्रामचे संशोधन संचालकही आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)