रात्री ११ वाजताचा थरार! सोलापूरहून तिरुपतीला जाताना झोपेच्या आहारी गेलेल्या ड्रायव्हरने कसा अपघात घडवला?
esakal October 17, 2025 12:45 AM

खूप जुनी आठवण. मोठ्या हौसेनं तिरुपतीला बालाजीदर्शनाला गेलो होतो. घरातून दोघी बहिणी, त्यांचे मिस्टर, वहिनी आणि मुलं असा प्रवास करायचा ठरलं. रात्री ११ वाजता सोलापूरहून प्रवास चालू झाला. तेव्हा प्रवास सुखाचा नव्हता- कारण आतासारखे चौपदरी रस्ते नव्हते, रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते, अशी अवस्था होती.

त्यात जीपचालक तेलुगू बोलणारा, बऱ्यापैकी मराठी त्याला कळायचं, पण कळून न कळल्यासारखं दाखवायचा. मध्यरात्र होऊ लागली तसा तो ड्राइव्हर गुंगू लागला, बाजूला बसलेल्या माझ्या बहिणीच्या मिस्टरांना ते लक्षात येऊ लागलं, ते त्याला सतत जागं ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. कारण कुठेतरी गाव जवळ पाहून, पेट्रोल पंप पाहून गाडी थांबवावी, असा विचार प्रत्येकाच्या मनात होता.

Konkan Travel Story : कोकणातील सुट्टीत थरार! आरवली बीचवर माझ्या पती-मुलाने बुडणाऱ्या दोघांना कसे वाचवले?

सगळीकडे काळाकुट्ट अंधार आणि आम्ही सारे असे अनिभीज्ञ मंडळी त्यामुळे दडपण येत होतं. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न फसू लागला, तो उर्मटपणे उत्तरे देऊ लागला. कसंबसं त्याला गोडीत घेत प्रवास चालू ठेवला. इतक्यात रस्त्याच्या कडेनं टाकलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर गाडी जाणार हे वहिनीच्या लक्षात आलं, तशी ती ओरडली; पण गाडीवरचा त्याचा ताबा तोवर सुटला होता आणि गाडी सरळ ढिगाऱ्याला धडकली.

सगळेच गांगरून गेलो, मुलं जागी झाली, आजूबाजूला किर्रर्र अंधार, रातकिड्याचा आवाजाने भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेलं होतं. त्याला विनंती केली, तोंडावर पाणी मारायला लावलं, गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन त्याला रस्त्यावर आणलं.

Kokan Tourism : दापोलीचा अप्रतिम निसर्गसौंदर्याचा खजिना… कोकणातील या लपलेल्या स्वर्गाला एकदा तरी नक्की भेट द्या!

आमच्या कुणालाचं ड्रायविंग येत नव्हतं. देवाचं स्मरण करत कसेबसे एका पेट्रोल पंपावर आलो. मग कुठे जीवात जीव आला. गाडीतच बसून राहिलो, त्यानं झोप घेतली आणि सकाळी सकाळी पुढचा प्रवास चालू झाला. दुपारी तिरुपतीमध्ये पोहचलो, तेव्हा कुठे सुटकेचा निश्वास सोडला. -प्रा.

डॉ. अनिता मुदकण्णा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.