आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रत्येक संघाने प्रत्येकी 4-4 सामने खेळले आहेत. तर पाचव्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण चौथा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली. तर या पाचव्या फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. पाचव्या फेरीतील सामना प्रत्येक संघासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या फेरीतील एका चूकीमुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं.
या स्पर्धेतील 18 वा सामना यजमान श्रीलंकेसाठी अतिशय अटीतटीचा आणि करो या मरो असा आहे. श्रीलंकेला याआधीच्या खेळलेल्या 4 पैकी एकही सामना जिंकता आला नाही. श्रीलंकेला एकूण 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना शुक्रवारी 17 ऑक्टोबरला होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने हे सलग जिंकले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका शुक्रवारी श्रीलंकेला पराभूत करुन सलग चौथा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता दक्षिण आफ्रिका यात यशस्वी होणार की यजमान श्रीलंका विजयाचं खातं उघडणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.