आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या वूमन्स टीम इंडियाने स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली. यजमान टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर ज्याची भीती होती तसंच झालं. भारताला सलग 2 विजयानंतर सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला. भारताची या 2 पराभवांमुळे गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. भारताचं या 2 पराभवांमुळे उपांत्य फेरीतील समीकरण हे अटीतटीचं झालं आहे. भारताला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित 3 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं असेल? तसेच टीम इंडियाला कोणती चूक सुधारावी लागेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेटने खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 7 सामने खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडियाचे या स्पर्धेत एकूण 3 सामने शेष आहेत. टीम इंडिया आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात 19 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्यानंतर महिला ब्रिगेड 23 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध 2 हात करणार आहे. तर भारतीय महिला संघासमोर सातव्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. हा सामना 26 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकण्याची संधी होती. मात्र गोलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्यामुळे भारताला या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. भारताचा या सलग 2 पराभवांमुळे उपांत्य फेरीचा प्रवास काही प्रमाणात अवघड झाला आहे, मात्र अशक्य नाही.
भारताने या स्पर्धेत 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने गमावले आहेत. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानवर मात केली. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. आता भारताने उर्वरित 3 सामने जिंकल्यास एकूण 10 पॉइंट्स होतील. टीम इंडिया अशा प्रकारे सेमी फायनलमध्ये पोहचू शकते. टीम इंडियाला स्वत:च्या जोरावर सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर तिन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच महिला ब्रिगेडने 2 सामने गमावले तर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग होईल.
आता 3 पैकी 2 सामनेच जिंकता आले तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची किती शक्यता आहे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. टीम इंडिया 2 विजयांसह उपांत्य फेरीत पोहचू शकते. मात्र त्यासाठी भारतीय संघाला दुसर्या संघांच्या समीकरणांवर अवलंबून रहावं लागणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग या स्पर्धेतील चिंताजनक मुद्दा राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाच्या सलामीला जोडीला काही खास करता आलं नाहीय. सलामी जोडीने चांगलं केलं तर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केलीय किंवा अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असूनही तसं करण्यात अपयश आलं. त्यामुळे टीम इंडियाला उर्वरित सामन्यांमध्ये ही चूक टाळावी लागेल.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 43 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या होत्या. टीम इंडियाने 1 विकेट गमावून 81 धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताची स्थिती 81-2 ते 124-6 अशी झाली होती. मात्र शेवटच्या फलंदाजांनी झुंज देत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करत भारताला विजयी सुरुवात करुन देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
पाकिस्तान विरुद्धही भारताला संपूर्ण 50 ओव्हर खेळल्यानंतरही 250 धावांपर्यंत पोहचता आलं नव्हतं. पाकिस्तानने टीम इंडियाला 247 धावांवर रोखलं होतं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने अवघ्या 19 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या होत्या. टीम इंडियाचा स्कोअर 83-1 असा होता जो काही ओव्हरनंतर 6 आऊट 102 असा झाला. टीम इंडियाने या सामन्यात 251 धावा केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने 155 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला संधी असूनही 350 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचे 6 विकेट्स अवघ्या 36 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला अशाप्रकारे 330 रन्सवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं.
त्यामुळे जेव्हा सलामी जोडी खेळलीय तेव्हा मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाज काही खास करु शकले नाहीत. मिडल ऑर्डरने निराशा केलीय तेव्हा लोअर ऑर्डरने सावरत भारताला सन्माजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. त्यामुळे आता भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. आता महिला ब्रिगेड रविवारी 19 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तसेच खऱ्या अर्थाने यजमान संघाला कोणत्याही स्पर्धेत इतर संघांच्या तुलनेत घरच्या परिस्थितीची अधिक माहिती असते. कोणत्या स्टेडियममध्ये परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यावा? याची माहिती कर्णधार तसेच टीम मॅनेजमेंटला अधिक असते. मात्र अद्याप या स्पर्धेत टीम इंडियाला घरच्या परिस्थितीचा फायदा घेता आलेला नाहीय किंवा फायदा झालेला नाही. त्यामुळे यजमान उर्वरित सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट विश्वाची करडी नजर असणार आहे.