क्षयरोग कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात!
दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने हजारो कुटुंबाची दिवाळी अंधारात जाणार आहे. सध्या मुंबई व उपनगरांतील पालिका रुग्णालय व आरोग्य केंद्रांवर ४५० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
मुंबई शहर व उपनगरांतील झोपडपट्टीतील प्रदूषण, अस्वच्छता अरुंद घरे व योग्य पौष्टिक आहार न मिळाल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे दिवसेंदिवस क्षयरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालिका आरोग्य विभाग व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्य सरकार वेळवर निधी देत नसल्याने कर्मचाऱ्यांना गेले कित्येक महिने पगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांना सतत क्षयरोग्यांच्या संपर्कात काम करावे लागत असते. दिवाळीतदेखील गेल्या दोन महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात ३८ ते ४० हजार कर्मचारी काम करीत आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना गेले दोन ते तीन महिने पगार मिळालेला नाही. १५व्या वित्त आयोग कार्यक्रमांतर्गत आलेला निधी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी वळवण्यात यावा, असा प्रस्ताव एकत्रीकरण समितीतर्फे देण्यात आला होता. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला नाही. कर्मचाऱ्यांचा पगार पालिकेच्या निधीतून देता येईल का याचा विचारविमिनिय सुरू आहे.
- डॉ. दक्षा शहा,
कार्यकारी आरोग्य अधिकारी,
मुंबई महापालिका
राज्य सरकारतर्फे तीन महिने निधी आलेला नाही. कामगारांना पगार मिळाला नाही तर आंदोलन करण्यात येईल.
- बाबा कदम
अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना