नाशिक: रामतीर्थावरील वस्त्रांतरगृहाचे पाडकाम गुरुवारी (ता. १६) रात्री सुरू असताना खाली असलेल्या प्राचीन दत्त मंदिरावर बांधकाम कोसळून मंदिर उद्ध्वस्त झाले. ही बाब आज सकाळी निदर्शनास येताच धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत हे मंदिर जसे होते, तसे पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले.
मंदिरातील मूर्ती सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पुरोहित संघाची लगबग सुरू होती. येथील उर्वरित मंदिरांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उद्यापासून हे पाडकाम यंत्राऐवजी मजुरांकरवी करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांच्यासह महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी उपस्थितांना दिले.
रामतीर्थावरील वस्त्रांतरगृहाच्या इमारतीचे पाडकाम जेसीबी, पोकलॅन्डच्या सहाय्याने सुरू आहे. ते सुरू असताना गुरुवारी रात्री वस्त्रांतरगृहाचा मोठा भाग कोसळून त्याखालील प्राचीन दत्त मंदिर उद्ध्वस्त झाले. त्यामुळे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते तेथे जमा झाले. संपूर्ण मंदिरच कोसळल्याने उपस्थितांनी प्रशासनावर धार्मिक भावना न जपल्याने तीव्र संताप व्यक्त केला.
मनपा आयुक्त खत्री, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता अग्रवाल, बांधकाम विभागाचे सुनील रकटे, पुरोहित संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, कल्पना पांडे तेथे आले. दुपारी दोनच्या सुमारास मंत्री महाजनही तेथे आले, त्यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत याठिकाणी पुन्हा मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले.
आजपासून मजुरांकरवी काम
कुंभमेळामंत्री महाजन यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी अधिकाऱ्यांसह याठिकाणी भेट देत माहिती जाणून घेतली. कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेत उद्यापासून हे पाडकाम यंत्राचा वापर न करता ‘मॅन्युअली’ करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, हे मंदिर आहे तसेच बांधून देण्याचे आश्वासनही दिले.
प्राचीन दत्त मंदिर नव्याने बांधून देण्याचे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यापुढे उर्वरित मंदिरांना क्षती पोहोचू नये म्हणून हे पाडकाम यंत्राऐवजी मजुरांकरवी करावे, जेणेकरून योग्य काळजी घेतली जाईल.
- चंद्रशेखर पंचाक्षरी, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ
प्रशासनाने यापुढे रामतीर्थ परिसरातील कोणतेही काम करताना गंगा गोदावरी पुरोहित संघाला विश्वासात घ्यावे, अन्यथा अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीचे काम होऊन ऐन सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
- सतीश शुक्ल, प्रमुख विश्वस्त, गंगा गोदावरी पुरोहित संघ
दिवाळीत भाविकांच्या पिकअपचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखलरामतीर्थावरील पाडकामावेळी श्री दत्त मंदिराची मोठी हानी झाली आहे. भविष्यात अशी कामे करताना हिंदूंच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
- श्री महंत सुधीरदास महाराज, वंशपरंपरागत पुजारी, श्री काळाराम संस्थान