विशेष विद्यार्थ्यांनी साकारल्या नक्षीदार पणत्या
डॉ. कुसुमताई सदाफुली कार्यशाळेचा उपक्रम
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः डॉ. कुसुमताई सदाफुली कार्यशाळेतील बौद्धिक अक्षम म्हणजे विशेष विद्यार्थ्यांनी यावर्षीदेखील आपल्या कल्पकतेतून विविध रंगांच्या पणत्या रंगवून आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले. विशेष विद्यार्थ्यांना काही सामाजिक कलाकार, शिक्षक पणत्या रंगविण्याचे मार्गदर्शन करतात.
विशेष विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या पणत्या, कंपन्या, कार्यालय आणि मंत्रालयात विक्री केल्या जातात. यातील काही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
कांदिवली पश्चिमेत डॉ. कुसुमाताई नरवणे कर्णबधिर शाळा आणि सदाफुली कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी रामकृष्ण शिक्षण मंडळाच्या डॉ. त्रि. रा. नरवणे व्यवस्थापनाकडून विविध कला शिकविल्या जातात.
कागदी फुले, फुलदाणी, पोस्टर, चित्रकला, राख्या बनवणे आणि दिवाळीला विविध रंगांनी, नक्षीदार आकर्षक पणत्या रंगवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यंदादेखील एक महिनाआधीपासून शिक्षक, समाजसेवकांनी विद्यार्थ्यांना पणत्या रंगवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी जवळपास तीन हजार पणत्या रंगवल्या. या पणत्या मंत्रालय, पालिका कार्यालय, संस्था आणि मंडळांना विक्री करण्यात येतात.
‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेनुसार विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू सामाजिक संस्था, शासकीय कार्यालय आणि महापालिकेचे कर्मचारी खरेदी करून सामाजिक बांधिलकी जोपासतात. त्यामुळे विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.