रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत गोवा आणि चंदीगड यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गोव्याच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. गोवा संघाला 115 धावांपर्यंत 3 धक्के बसले. त्यानंतर अभिनव तेजराणा आणि ललित यादव यांनी डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी 309 धावांची भागीदारी केली. अभिनव तेजराणाने जबरदस्त खेळी केली आणि पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात त्याने द्विशतक ठोकलं. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनाही ही कामगिरी करता आली नाही. पण तेजराणाने पहिल्याच सामन्यात ही किमया केली. त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं होतं. तर दुसऱ्या दिवशी द्विशतकी खेळी केली. गोव्यासाठी पहिल्याच दिवशी शतकी खेळी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यात अर्जुन तेंडुलकरचं नावही आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा अभिनव 130 धावांवर खेळत होता. त्याने आणखी 70 धावा काढल्या आणि 301 चेंडूत त्याच्या कारकिर्दीतील पहिलं द्विशतक ठोकलं. रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात गोव्याकडून द्विशतक ठोकणारा पहिला आणि स्पर्धेच्या इतिहासातील 13वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ, अमोल मजूमदार, जय गोहिल, अंशुमान पांडे, मनप्रीत जुनेजा, जीवनजोत सिंह, अभिषेक गुप्ता, अजय रोहेरा, मयंक राघव, अर्सलान खान, सकीबुल गनी, पवन शाह आणि सुवेद पारकर यांनी ही कामगिरी केली.
दुसरीकडे, अभिनव तेजराणानंतर ललित यादवनेही द्विशतकी खेळी केली. त्याने 22 चौकार आणि 4 षटकार मारत द्विशतक ठोकलं. त्याने एकूण 213 धावा केल्या. या सामन्यात अर्जुन तेंडुलकर काही खास करू शकला नाही. फक्त एक धाव करून बाद झाला. पण गोलंदाजीत कमाल केली. दुसऱ्या षटकात गोव्याला यश मिळवून दिलं. अर्जुन तेंडुलकरने शिवम भांबरीला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चंदीगडने 1 गडी गमवून 34 धावा केल्या आहे. यात अर्जुन आझाद नाबाद 21 आणि मनन वोहरा नाबाद 11 धावांवर खेळत आहे.