राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून नुकताचं विभागनिहाय बैठका घेऊन संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. जिथे-जिथे युती शक्य असेल तिथे महायुतीमध्येच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे, मात्र जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रिपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भाजप नंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील ठाण्यात स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस व ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी याबाबत तशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय महापौर आमचाच बसणार तर महापौर हा आमच्याच मर्जीतला बसणार, असं विश्वासही यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. भाजपने ठाण्यात अबकी बार ७० पारचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अबकी बार २५ पार नारा देण्यात आला आहे.
दरम्यान ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात आता महायुतीचे दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळाचा नारा दिल्यानं एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे ठाण्यात शिवेसना शिंदे गटाची देखील महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पदाधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले आहेत. युतीबाबत सर्व निर्णय आता फक्त शिंदेंच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.