एकनाथ शिंदे नाराज? घेतला मोठा निर्णय, पक्षाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi October 17, 2025 02:45 PM

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षस्तरावर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढवल्या जाणार की काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असं महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे, मात्र पदाधिकारी स्वबळाचा नारा देत असल्याचं पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये त्या -त्या विभागांमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला . यावर बोलताना जिथे-जिथे शक्य असेल तिथे आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुका लढवणार, तर काही ठिकाणी शक्य नसेल तिथे  मैत्रिपूर्ण लढत होतील, मात्र मैत्रिपूर्ण लढत होत असताना देखील महायुतीमधील मित्र पक्षांवर टोकाची टीका केली जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली, जिल्हाप्रमुख या नात्याने नरेश म्हस्के यांनी ही बैठक घेतली होती, मात्र या बैठकीमध्ये ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  यापुढे युतीबाबत केवळ एकनाथ शिंदे हेच भाष्य करणार, कोणी भाष्य केल्यास तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा निर्णय झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.