दिवाळीच्या हक्काच्या सुटीत प्रशिक्षण नको
esakal October 18, 2025 11:45 AM

-rat१६p२७.jpg-
२५N९९०२२
रत्नागिरी ः जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना प्राथमिक शिक्षक.
-----
दिवाळीच्या हक्काच्या सुटीत प्रशिक्षण नको
शिक्षक संघटनांचा आक्षेप; जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी तसेच नवनियुक्त शिक्षकांचे आठ दिवसांचे प्रशिक्षण दिवाळी सुटीत आयोजित केले आहे. त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांचीही दिवाळी प्रशिक्षणातच जाणार आहे. यावर सर्व शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला असून, दिवाळीच्या हक्काच्या सुटीत प्रशिक्षण नको, अशी भूमिका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे मांडली आहे.
शिक्षण परिषद पुणे व जिल्हा प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत २०१९ पासून नवनियुक्त शिक्षक त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीसाठी शिक्षकांची २६ ऑक्टोबरपासून आयोजित करण्यात आले आहे. याबाबत शिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. दिवाळीच्या हक्काच्या सुटीत प्रशिक्षण नकोच, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. दिवाळी सुटी झाल्यानंतर हे प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी (ता. १५) याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेतली. हे प्रशिक्षण जिल्हा परिषदेने आयोजित केलेले नाही. पुणे शिक्षण परिषद आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी स्पष्ट केले. रद्द करण्याचा अधिकार आपल्याला नसून, जिल्हा प्रशिक्षण संस्था किंवा शिक्षण परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. यानंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशिक्षण संस्था यांची भेट घेतली. या वेळी प्राचार्य कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हे प्रशिक्षण सुटीमध्ये आयोजित न करता सुटीनंतर घेण्यात यावे. शिक्षकांना प्रशिक्षणाची सक्ती केली तर त्यावर आमचा बहिष्कार असेल, असे या निवेदनात स्पष्ट नमूद केलेले आहे. तसेच जबरदस्तीने प्रशिक्षण घेतले तर ज्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू असेल तर सर्व शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीचे पदाधिकारी बंद पाडण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी समन्वय समिती अध्यक्ष दिलीप देवळेकर, समिती निमंत्रित संतोष पावणे, प्रकाश काजवे, दीपक नागवेकर, अंकुश चांगण, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
--------
चौकट १
नियोजनावर फेरले पाणी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सुटी असणार आहे. यंदा गणपती सुटी १० दिवसाची होती. आता दिवाळी सुटी ११ दिवसांची आहे. प्रशासनाने वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी आणि नवनियुक्ती शिक्षकांचे प्रशिक्षण २६ तारखेपासून आयोजित केल्याने अनेक शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. सुटी असल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचा, गावाला जाण्याचा तसेच फिरण्याचा बेत आखला होता. त्यावर पाणी फेरणार आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.