NSE सुट्ट्या 2025 नवी दिल्ली: संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात दिवाळाची सण साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं विविध संस्था, आस्थापनांकडून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दिवाळीत शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. देशातील दोन्ही प्रमुख स्टॉक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईवर ट्रेडिंग बंद राहणार आहे. शेअर बाजार चार दिवस बंद राहणार असला तरी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. त्यानिमित्तानं एक तास शेअर बाजार सुरु राहील. येत्या आठवड्यात शेअर बाजाराला कोणत्या चार दिवस सुट्टी असेल हे जाणून घेणार आहोत.
भारतीय शेअर बाजार 21 ऑक्टोबरला मंगळवारी दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त बंद राहणार आहे. यानंतर 22 ऑक्टोबरला दिवाळी बालिप्रतिपदेच्या निमित्तानं शेअर बाजारात ट्रेडिंग होणार आहे. 25 ऑक्टोबरला शनिवार आणि 26 ऑक्टोबरला रविवार असल्यानं या दिवशी देखील शेअर बाजार बंद राहील. म्हणजेच येत्या आठवड्यात केवळ तीन दिवस शेअर बाजार सुरु राहील. दिवाळीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज 21 आणि 22 ऑक्टोबरला बंद राहील.
दिवाळीच्या निमित्तानं एनएसई आणि बीएसईवर मुहूर्त ट्रेडिंग साठी 21 ऑक्टोबर 2025 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार 21 ऑक्टोबरला दुपारी 1.45 ते 2.45 वाजता मुहूर्त ट्रेडिंग करु शकतात. प्री- ओपन सेशन 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग गुंतवणूकदारांसाठी शुभ मानलं जातं. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतणवूक केल्यानं वर्षभर समृद्धी आणि लाभाच्या संधी मिळतात, असं मानलं जातं. भारतात मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. भारतीय गुंतवणूकदार दिवाळीला नवी वर्षाची सुरुवात म्हणून पाहतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन वर्षाची सुरुवात सकारात्मक करण्याचा विचार करतात. गेल्या काही वर्षांचा डेटा पाहिला तर मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान भारतीय शेअर बाजारात शुभ संकेत दिसून आले आणि बाजार तेजीसह बंद झाला.
पुढील आठवड्यात दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर 5 नोव्हेंबरला शेअर बाजार गुरुनानक जयंती आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बंद राहील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा