-नियमित आहारात आयोडीनयुक्त मीठ वापरा
esakal October 18, 2025 11:45 AM

-rat१७p१४.jpg-
P२५N९९१८७
रत्नागिरी ः आयोडिनयुक्त मिठाच्या वापराची जनजागृतीच्या फलकाचे अनावरण करताना डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. भास्कर जगताप, डॉ. मिताली मोडक, डॉ. शैलेश खरटमोल आदी.
----
आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरा
डॉ. अनिरुद्ध आठल्ये ः शाळा, गावांमध्ये जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः आयोडीन हा शरीरासाठी लहान; पण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक भागांमध्ये जमिनीतील आयोडीन कमी असल्याने लोकांमध्ये त्याची कमतरता आढळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोजच्या आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विकार व आयोडिनयुक्त मिठाचा वापर याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून २१ ऑक्टोबर हा जागतिक आयोडीन न्यूनताविकार प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने १४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्यकेंद्र, गाव, शाळा, महाविद्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोडीन हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक असून, तो थायरॉईड ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या थायरॉईड हार्मोन्स निर्मितीसाठी आवश्यक आहे. हे हार्मोन्स शरीरातील वाढ, विकास आणि चयापचयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आयोडिनची कमतरता झाल्यास गलगंड, मानसिक दुर्बलता, वाढ खुंटणे तसेच गर्भधारणेदरम्यान भ्रूणविकासावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः बाल्यावस्था, पौगंडावस्था, गर्भधारणा आणि प्रसूतीच्या काळात (म्हणजे मातांच्या दुधासाठी ) आयोडिनची गरज अधिक असते. या काळात आयोडिनच्या कमतरतेमुळे बाळाचा मेंदू, शरीरविकास आणि बुद्धिमत्ता यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. दररोज आहारामध्ये आयोडिनयुक्त मिठाचा वापर केला तर गलगंड, मानसिक दुर्बलता, वाढ खुंटणेसारख्या आजारापासून संरक्षण मिळते. त्यामुळे आयोडिनयुक्त मिठाचा वापर करावा, असे आवाहन डॉ. आठल्ये यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.