राज ठाकरेंनी मतदार यादीच्या घोळाबद्दल केलेल्या आरोपात किती तथ्य? मोठी माहिती समोर
Tv9 Marathi October 17, 2025 02:45 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासह मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार यादीतील घोळाबाबत तक्रार केली. या भेटीनंतर सर्व विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील मतदार यादीतील घोळाबाबत मोठा आणि गंभीर खुलासा करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद नोंदी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता नुकतंच याबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे.

कांदिवलीत एकाचा पत्ता, मतदार दुसरा

राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत विविध आरोप केले होते. आता त्यांनी केलेल्या आरोपानुसार कांदिवली पश्चिम मतदारसंघातील मतदार यादीत गंभीर घोळ दिसून आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीतील पत्त्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक विसंगती समोर आल्या आहेत. कांदिवलीतील गणेश नगर येथील एका पत्त्यावर नंदिनी महेंद्र चव्हाण नावाच्या व्यक्तीची नोंद मतदार यादीत आहे. मात्र, या पत्त्यावर गेली ३० वर्षांपासून द्रौपदी वर्मा नावाचे कुटुंब राहत आहे, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. यामुळे मूळ पत्त्यावर राहत नसतानाही संशयास्पद नावाची नोंद मतदार यादीत कशी झाली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नालासोपाऱ्यात मतदार नोंदणी असलेल्या व्यक्ती गायब

मुंबईव्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघातही मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. या ठिकाणी सुषमा गुप्ता नावाच्या एकाच महिलेचे तब्बल सहा वेळा नाव नोंदवलेले आढळले आहे. या महिलेचा मतदार यादीत माता जीवदानी चाळ, नालासोपारा पूर्व, तुळींज असा पत्ता नमूद आहे. याबद्दल टीव्ही ९ मराठीच्या टीमने रियालिटी चेक केला असता येथे गुप्ता नावाचे कोणीही रहिवासी राहत नसल्याचे समोर आले आहे.

टीव्ही ९ मराठीच्या संपूर्ण टीमने या जीवदानी चाळीतील स्थानिक माजी नगरसेवक, मंडळाचे कार्यकर्ते आणि महिलांना याबद्दल विचारपूस केली. पण त्यातील कोणीही गुप्ता नावाची महिला इथे राहते, याची कबुली दिलेली नाही. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे आगामी निवडणुकीत मतदार यादीच्या घोळाचा मुद्दा गाजणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व विरोधी पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मतदार याद्यांमध्ये पद्धतशीरपणे घोळ घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.