निरुपयोगी वस्तू संकलन महाअभियान
esakal October 17, 2025 11:45 AM

निरुपयोगी वस्तू संकलन महाअभियान
टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन; पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : कल्याण डोंबिवली महापालिका आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने तसेच सहयोग सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेत तीनदिवसीय ‘निरुपयोगी वस्तू संकलन महाअभियान’ आयोजित केले आहे. गुरुवारपासून (ता. १६) सुरू झालेले हे अभियान १८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना त्यांच्या घरातील आणि परिसरातील टाकाऊ, निरुपयोगी तसेच न वापरण्यायोग्य वस्तू योग्य पद्धतीने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज सकाळी १० वाजल्यापासून या वस्तूंचे संकलन सुरू केले जात आहे.

दिवाळीपूर्वी घरातून नको असलेल्या वस्तू काढून टाकण्याची जी प्रथा आहे, तिचा उपयोग समाजहितासाठी करून घेणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जुने फर्निचर आणि लाकूड, गाद्या आणि चिंध्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, प्लॅस्टिक वस्तू, इतर निरुपयोगी सामग्रीचा यात समावेश आहे. नागरिकांनी त्यांच्या घरातील किंवा व्यवसायस्थळी असणाऱ्या न वापरण्यायोग्य वस्तू संबंधित संकलन केंद्रावर अथवा आरआरआर सेंटरमध्ये जमा कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.

आयुक्तांनी नागरिकांना या महाअभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना कचरा व्यवस्थापन, जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभाग, संकलन केंद्रे आणि स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सक्रिय योगदान देत आहेत. महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील धोरणबदल, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा सहभाग वाढवून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या वेळी सहभागी संस्थांकडून सांगण्यात आले.

प्रमुख उद्दिष्ट्ये
परिसरातील स्वच्छता वाढवणे.
मोठ्या प्रमाणावर टाकाऊ वस्तूंचा योग्य निपटारा करणे.
जमा झालेल्या वस्तूंचा योग्य रीतीने पुनर्वापर किंवा रिसायकल करून कचऱ्याचे प्रमाण कमी करणे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.