क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये गेल्या काही वर्षात बरेच बदल होत गेले. आतापर्यंत तीन फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. टी20, वनडे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये सध्या क्रिकेट खेळलं जात आहे. आता क्रिकेटच्या चौथ्या फॉर्मेटचा उदय होत आहे. यामुळे क्रिकेटचा रोमांच आणखी वाढणार आहे. टेस्ट आणि टी20 फॉर्मेटचा मिलाफ नव्या फॉर्मेटमध्ये पाहायला मिळणार आहे. हा जगातील पहिला 80 षटकांचा फॉर्मेट असणार आहे. दोन्ही संघांना कसोटीसारखं 20-20 षटकांचे दोन डाव खेळण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करणार आहे. जसं कसोटी सामन्यात होतं अगदी तसंच..या फॉर्मेटमध्ये कसोटी आणि टी20 क्रिकेटचे दोन्ही नियम लागू होणार आहे.
टेस्ट ट्वेंटी सामन्याचा निकाल कसा लागणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या सामन्यात विजय, पराभव, टाय किंवा सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. यामुळे कसोटीसह टी20 क्रिकेटचा आनंदही लुटता येणार आहे. एखादा संघ पहिल्या डावात 75 धावांनी पिछाडीवर असेल तर त्याला फॉलो-ऑन खेळावा लागेल. पण या फॉर्मेटमध्ये चेंडू लाल की पांढरा वापरायचा हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. प्रत्येक संघात एकूण 16 खेळाडू असतील आणि पहिल्या पर्वात सहा संघ असण्याची शक्यता आहे. टेस्ट ट्वेंटीचं पहिलं पर्व 2026 पासून सुरु होणार आहे. ही फक्त 19 वर्षाखालील स्पर्धा असेल. ही स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.
या फॉर्मेटच्या लिलावात 96 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर क्लाइव लॉयड यांनी सांगितलं की, ‘क्रिकेटचं प्रत्येक युग पाहिल्यानंतर मी एक गोष्ट सांगू शकतो की खेळ कायम अनुकूल राहीला आहे. पण मुद्दाम असं काहीच नाही. कसोटी ट्वेंटी खेळाची लय परत आणेल आणि आधुनिक उर्जेसह जिवंत ठेवेल.’
वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू क्लाइव लॉयड, दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह हे खेळाडू टेस्ट ट्वेंटी फॉर्मेटच्या सल्लाकार बोर्डमध्ये असणार आहे. यासह राजस्थान रॉयल्सचा माजी सीईओ मायकल फोर्डहम यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं आहे. दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांनी सांगितलं की, ‘क्रिकेटच्या नव्या फॉर्मेटमुळे उत्साह वाढणार आहे. यामुळे तरुण खेळाडूंना खूप साऱ्या संधी मिळतील.’