मुंबई, 17 ऑक्टोबर 2025 :मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर चमक दाखविण्याची आणि राज्यस्तरीय क्रिकेट संघांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या 24 व्या द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर स्मृती निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहपूर्ण सुरुवात झाली. मुंबईतील प्रतिष्ठित पी. जे. हिंदू जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे भव्य उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे (MCA) अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला MCA सचिव श्री. अभय हडप, संयुक्त सचिव श्री. दीपक पाटील, तसेच MCA कार्यकारिणी सदस्य श्री. निलेश भोसले, श्री. कौशिक गोडबोले, श्री. सुरेंद्र करमळकर आणि ज्येष्ठ रणजीपटू व प्रशिक्षक श्री. गोपाळ कोळी यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेची औपचारिक सुरुवात होताच मैदानावर तरुण खेळाडूंच्या उत्साहाने ऊर्जा संचारली.
ही स्पर्धा चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक (CPCC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, तिचे संचालन एमएसएसएफ ट्रस्ट करत आहे. मुंबई क्रिकेट क्षेत्रात या स्पर्धेला विशेष मान आहे कारण ती मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी म्हणून ओळखली जाते. अनेक तरुण खेळाडूंनी याच स्पर्धेतून आपला क्रिकेट प्रवास सुरू करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे.
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि स्व. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य श्री. चंद्रकांत पंडित आणि MCA सदस्य श्री. निलेश भोसले यांनी गेली 24 वर्षे ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून मुंबई क्रिकेटमध्ये सातत्याने नवे प्रतिभावंत घडविले आहेत. या वर्षीच्या स्पर्धेत 33 संघ सहभाग घेत असून, सामने 17 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खेळविले जाणार आहेत.
स्पर्धा दोन दिवसांच्या नॉकआउट पद्धतीने खेळविली जात असून, बांद्रा ते विरार परिसरातील नामांकित क्रिकेट क्लब आणि शाळांचे संघ यात सहभागी झाले आहेत. प्रत्येक सामन्यात खेळाडूंना शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि क्रीडास्पृहा दाखविण्याची संधी मिळणार आहे.
श्री. चंद्रकांत पंडित यांनी उद्घाटनावेळी सांगितले की, “आचरेकर सरांच्या शिकवणीचा वारसा जपत आम्ही ही स्पर्धा सुरू ठेवत आहोत. मुंबईतील तरुण क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणे हेच या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.”
द्रोणाचार्य आचरेकर सरांच्या क्रिकेट संस्कारांची ही स्पर्धा आजही जपली जात असून, मुंबई क्रिकेटमधील नव्या पिढीच्या घडणीत तिचा मोठा वाटा राहिला आहे.