भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे. भारतीय संघ 16 ऑक्टोबरला पर्थमध्ये चार तास उशिराने पोहोचला. त्यामुळे हा दिवस पूर्णपणे आराम करण्यात गेला. मात्र सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय संघाने पर्थमध्ये चांगलाच घाम गाळला. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये तीन तास सराव केला. रिपोर्टनुसार, या सरावात टीम इंडियाने सर्वाधिक सराव हा फिल्डिंग आणि झेल पकडण्याचा केला. त्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजीवर मेहनत घेतली गेली. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावरून बरीच टीका झाली होती. त्यामुळे या चुका टाळण्यासाठी भारतीय संघ फिल्डिंगवर लक्ष केंद्रीत करून आहे. दुसरीकडे, शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी एकत्र फलंदाजी केली. तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने एकत्र सराव केला.
शुबमन गिल कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतरही त्याने रोहित शर्मा मान दिला. शुबमन गिलने रोहित शर्माकडून कर्णधारपदाचे बारकावे समजून घेतले. रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाची परिस्थिती आणि खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडून काही महत्त्वाच्या टीप्स घेतल्या. यावेळी शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात चांगली बाँडिंग दिसून आली. इतकंच काय तर रोहित शर्माने पर्यायी सराव शिबिरात भाग घेतला होता. यावेळी गौतम गंभीरसोबत त्याने चर्चा केली. रोहित शर्माकडून कर्णधारपद गेल्यानंतर पहिल्यांदाच गंभीरसोबत दिसला.
विराट कोहलीही रोहित शर्मासारखाच सात महिन्यांनी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याने सराव शिबिरात खूप मेहनत घेतली. रिपोर्टनुसार, सराव शिबिरात विराट कोहली आक्रमकपणे खेळताना दिसला. त्याने फलंदाजीत आक्रमकपणा दाखवल्याने सामन्यातही तसंच रुप पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्लेइंग 11 चा भाग असतील यात काही शंका नाही. आता दोघेही सात महिन्यानंतर मैदानात काय कामगिरी करतात? याकडे लक्ष लागून आहे.