रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळताना मोहम्मद शमीने एकाच षटकात तीन विकेट घेत फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं आहे. मोहम्मद शमीला इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. तेव्हा अजित आगरकर यांनी 2027 वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने टीमची बांधणी सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी संघात मोहम्मद शमीला स्थान का मिळालं नाही याबाबतही वाच्यता केली नाही. त्यानंतर मोहम्मद शमीने बीसीसीआय निवडकर्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितलं होतं की, रणजी ट्रॉफीसाठी फिट आहे तर 50 षटकांचं क्रिकेटही खेळू शकतो. आता मोहम्मद शमीच्या या विधानावर अजित आगरकर यांनी उत्तर दिलं आहे.
अजित आगरकर यांनी एनडीटीव्ही चर्चा करताना म्हणाला की, ‘जर शमी इथे असता तर मी त्याला उत्तर दिले असते. जर तो फिट असेल तर आपल्याकडे शमीसारखा गोलंदाज का नाही? मी त्याच्याशी अनेक वेळा बोललो आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांत, आम्हाला कळले आहे की तो फिट नाही. तो इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होण्याइतका तंदुरुस्त नव्हता. जर त्याने मला ते सांगितले असते तर मी त्याला उत्तर दिले असते. म्हणजे, जर तो इथे असता तर मी निश्चितच उत्तर दिले असते.’
अजित आगरकर पुढे म्हणाले की, ‘सोशल मीडियावर त्याने नेमके काय म्हटले हे मला माहित नाही. कदाचित त्याचे विधान पाहिल्यानंतर मी त्याला फोन करेन, परंतु माझा फोन सर्व खेळाडूंसाठी नेहमीच चालू असतो. गेल्या काही महिन्यांत मी त्याच्याशी अनेक वेळा बोललो आहे, परंतु मी तुम्हाला येथे कोणतेही बातम्या देऊ इच्छित नाही.’
मोहम्मद शमी याने प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, “अपडेट देण्याबाबत, अपडेट देणे किंवा अपडेट मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे,”