भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर जवळपास 7 महिन्यांनी दोघेही आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. या दोघांनी टी20 आणि कसोटी क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे वनडे मालिकेतच खेळताना दिसतील. त्यांनी हा निर्णय 2027 वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने घेतला असेल असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा या दोन्ही खेळाडूंसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात हे दोन्ही खेळाडू फेल गेले तर त्यांचं क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फेल गेले तर पुढे काय? बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच काय तर दोघांच्या वनडे वर्ल्डकप भविष्याबाबतही आपलं म्हणणं मांडलं आहे.
एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात अजित आगरकरला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा अजित आगरकरने या प्रश्नाचं उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढे सांगितलं की, लक्ष फक्त एक दोन खेळाडूंवर नाही तर संपूर्ण संघाच्या कामगिरीवर आहे. पण पुढचा प्रश्न एकदम गुगली होता. आगरकर यांना विचारलं गेलं की, या वनडे मालिकेतील कामगिरीवर दोन्ही खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे का? त्यावर आगरकर स्पष्ट नकार देत सांगितलं की, या दोन्ही फलंदाजांनी काहीच सिद्ध करण्याची गरज नाही. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या फलंदाजीने सर्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीचं आकलन एक मालिकेतून करू शकत नाही, असं अजित आगरकर म्हणाला.
अजित आगरकर म्हणाला की, ‘खरं तर याबाबत बोलणं मूर्खपणाचं ठरेल. कारण एकाची सरासरी 50 च्या वर आहे आणि एकाची 50च्या जवळ आहे. तुम्ही त्यांना प्रत्येक सामन्यात ट्रायलवर ठेवू शकत नाही. 2027 वर्ल्डकप अजून खूप दूर आहे. दोघे खूप वेळानंतर क्रिकेट खेळत आहेत. म्हणून तुम्हाला त्यांचे मूल्यांकन करावे लागेल. त्यांनी जवळजवळ सर्वकाही साध्य केले आहे. असे नाही की जर त्यांनी या मालिकेत धावा केल्या नाहीत तर त्यांची निवड होणार नाही किंवा जर त्यांनी तीन शतके केली तर ते 2027 च्या विश्वचषकात खेळतील.’ अजित आगरकर यांच्या विधानातून स्पष्ट आहे की, मालिकेतील अपयशानंतर त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट होणार नाही.