आशिया कप स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर विजयाचा घास त्यांच्या तोंडून खेचून आणला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानशी जवळीक साधेल असा कोणताच निर्णय घेतला नाही. नाणेफेक ते सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या नक्वीच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. पण नक्वीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ट्रॉफी घेऊन पसार झाला. त्यानंतर बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना 28 सप्टेंबरला झाला होता. ही स्पर्धा संपून आता 20 दिवसांचा काळ लोटला आहे. पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही.
रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वीने या ट्रॉफीला कोणालाही हात लावू देऊ नये असे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच परवानगीशिवाय कोणीही ही ट्रॉफी कार्यालयाबाहेर नेता कामा नये असे आदेश दिलेत. मग आता टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? असा प्रश्न आहे. बीसीसीआय ट्रॉफी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हा सर्व पेच आता एक बैठकीतच सुटणार असं दिसत आहे. या बैठकीनंतर टीम इंडियाच्या ट्रॉफीचा निकाल लागणार आहे.
28 सप्टेंबरच्या प्रकारानंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजेच 30 सप्टेंबरला एसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली होती. यात बैठकीत ट्रॉफीचा मुद्दा उचलला गेला होता. तेव्हा एसीसीमधील पाच कसोटी खेळणारे देश म्हणजेच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान याबाबत ठरवतील असं सांगितलं गेलं. ही बैठक आता पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणार असं सांगण्यात येत आहे. मोहसिन नक्वी या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे. पण या बैठकीतच ट्रॉफीबाबत अंतिम निकाल लागणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने ट्रॉफीबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे या बैठकीतच काय ते ठरेल असं स्पष्ट दिसत आहे.