दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच; भारताचं टेन्शन वाढलं
GH News October 18, 2025 02:11 AM

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचा 18वा सामना पावसामुळे रद्द करावा लागतो की काय अशी स्थिती होती. श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका सामन्यात पावसामुळे खंड पडला. सामना सुरु झाल्यानतंर अवघ्या काही तासातच मुसळधार पाऊस पडला. मात्र बराच काळ वाट पाहिल्यानंतर पाऊस गेला आणि 20 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 105 धावा केल्या. मात्र षटकं कमी केल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण अफ्रिकेसमोर 121 धावांचं आव्हान देण्यात आलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 14.5 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेक जिंकून काहीच फायदा झाला नाही. उलट दक्षिण अफ्रिका श्रीलंकेवर भारी पडली. दक्षिण अफ्रिकेने 10 गडी राखून हा सामना जिंकला.

श्रीलंकेला पराभूत केल्याने दक्षिण अफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे. या विजयामुळे गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच उपांत्य फेरीत आपला दावा पक्का केला आहे. दक्षिण अफ्रिकेने आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ देखील उपांत्य फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेंच असेल असंच दिसत आहे. कारण बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी एक सामना गमावला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

भारताची स्थिती काय?

भारताचे या स्पर्धेत एकूण तीन सामने शिल्लक आहे. त्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीत स्थान पक्कं होईल. पण एका सामन्यात पराभव झाल्यास गणित जर तरवर येईल. त्यात भारत न्यूझीलंड हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्याआधी इंग्लंडचा कठीण पेपर सोडवावा लागणार आहे. 19 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत न्यूझीलंड हा सामना होईल. तर 26 ऑक्टोबरला भारताचा सामना बांगलादेशशी होईल. आता या तीन सामन्यात कसं समीकरण जुळून येते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.