भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहे. खरं तर भारताची ऑस्ट्रेलियात अग्निपरीक्षा आहे. कोणता खेळाडू चांगला खेळतो आणि डाव सावरतो याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ चिवट खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियन खेळाडू सहजासहजी सामना सोडत नाही. इतकंच काय तर हातातून गेलेला सामनाही खेचून आणण्याची ताकद ठेवतात. असं असताना या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू संघातून बाद झाला आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कॅमरून ग्रीन आहे. दुखापतीमुळे तो या स्पर्धेला मुकला आहे. ऑस्ट्रेलियासाठी या स्पर्धेपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.
कॅमरून ग्रीनच्या जागी संघात मार्नस लाबुशेनची निवड करण्यात आली आहे. मार्नसचा फॉर्म काही चांगला नाही. त्यामुळेच त्याची संघात निवड झाली नव्हती. पण आता पर्याय नसल्याने त्याला संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संधी देण्याचा विचार केला गेला आहे. मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी 66 वनडे सामने खेळले आहेत. त्यात 1871 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. कॅमरून ग्रीन दुखापतीमुळे बाहेर गेल्याने ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण एशेज मालिका सुरु होणार आहे. पण त्याची दुखापत फार काही गंभीर नाही. त्याला लो ग्रेड इंजरी असल्याचं सांगण्यात येत आहे.
आगाजी एशेज मालिका पाहता त्याला आराम दिल्याचं बोललं जात आहे. तसेच मागच्या दुखापतीशी त्याचा काहीच संबंध नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे. कॅमरून ग्रीनला दुखापतीतून बरा होण्यासाठी थोड्या दिवसांचा अवधी लागणार असल्याची सांगण्यात येत आहे. 11 दिवसांत WACA येथे दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध पश्चिम ऑस्ट्रेलिया तिसऱ्या शिल्ड सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीही करेल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं की, ‘कॅमरून ग्रीन थोड्या कालावधीसाठी रिहॅबिलिटेशनमध्ये जाईल. या दरम्यान एशेज तयारीसाठी त्याची शेफील्ड शील्डमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या दुखापतीकडे लक्ष असणार आहे.’