लोणावळा, ता. १७ : मळवली येथील ‘संपर्क’ संस्थेच्या वतीने बेडसे (ता. मावळ) येथे महिलांसाठी स्तन कर्करोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. संपर्कच्या ‘एक दिवा आरोग्याचा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्य प्रकल्प समन्वयक नवनीता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सुत्रावे, डॉ. आशा सुत्रावे यांनी महिलांना स्तन कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे, तपासणीचे महत्त्व तसेच लवकर निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरतात याविषयी माहिती दिली. महिलांनी आरोग्य तपासणी करून घेत वैयक्तिक सल्लाही घेतला. शिबिरात स्तन कर्करोगाबाबतच्या विविध गैरसमजांना तज्ज्ञांनी शास्त्रीयदृष्ट्या उत्तरे दिली. महिलांनीही आरोग्याबाबत प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. या उपक्रमाला बेडसे परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.