PM Modi : आता तो दिवस दूर नाही…हीच मोदीची गॅरंटी, नक्षलवादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले आनंदाचे दिवे लखलखतील
Tv9 Marathi October 18, 2025 08:45 PM

PM Modi on Naxalites : गेल्या 50-55 वर्षात माओवादामुळे हजारो लोकांचा हकनाक बळी गेला. कित्येक सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांमुळे प्राणाची आहुती द्यावी लागली. आपण कित्येक नवतरुण गमावले, असे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. नक्षलवादी भागात त्यांनी कधी शाळा होऊ दिली नाही की कधी रुग्णालय बांधू दिले नाही. जितके विकास कामं केली ती बॉम्बने उडवली. अनेक दशकांपासून विकासाचा किरण या भागात पोहचला नाही. एक मोठी लोकसंख्या माओवादी दहशतवादामुळे विकासापासून वंचित राहिली. पण या भागातील परिस्थिती बदलली आहे. 50-55 वर्षात ज्यांनी दिवाळी पाहिली नाही, त्यांना आता आनंदाने दिवे लावता येतील. त्यांची दिवाळी उजळून जाईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

नक्षलवाद हा माओवादाचा दहशतवाद

एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर भाष्य केले. आता तो दिवस नाही, जेव्हा भारत माओवाद मुक्त होईल. नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळात अर्बन नक्षलवाद फोफावला, त्यामुळे नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या कोणत्याच घटना जगासमोर, देशासमोर येत नव्हत्या. त्यासाठी काँग्रेस सरकार मोठे सेन्सॉरशिप चालवत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

गेल्या 11 वर्षात देशातील 125 हून अधिक जिल्हे हे नक्षलप्रभावित होते. आज ती संख्या अवघ्या 11 वर आली आहे. या 11 जिल्ह्यांमधील केवळ 3 जिल्हे असे आहेत, जे सर्वाधिक नक्षलग्रस्त आहेत. केवळ 75 तासांमध्ये 303 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत. एकवेळी या 125 जिल्ह्यात केवळ गोळीची भाषा चालत असे. हे काही सामान्य नक्षली नव्हते. अत्यंत जहाल माओवादी होते. त्यांच्या डोक्यावर एक कोटी, लाखोंचे बक्षिस होते.

मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही वर्षांपर्यंत देशातील प्रत्येक मोठे राज्य नक्षलवादी हिंसा आणि माओवादाने पीडित होते. उर्वरीत देशात राज्य घटनेप्रमाणे राज्य होत होते. पण रेड कॉरिडोअरमध्ये राज्य घटनेचा नाव घेणे अवघड होते. जे आज संविधानाची प्रत डोक्याला लावून नाचतात. त्यांनी माओवादी, नक्षलवाद्यांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केले असे मी जबाबदारीने विधान करतो असा पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता बस्तर ऑलम्पिकची चर्चा

यापूर्वी छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद होता. बस्तरमध्ये त्यांच्या रक्तरंजित कारवायांचे मथळे माध्यमांत झळकत होते. इथे बॉम्बस्फोट झाला. इथे सुरक्षा रक्षक मारल्या गेले असे मथळे झळकत होते. बस्तर हा नक्षलवाद्यांचा गड होता. तिथे त्यांचेच राज्य होते. पण आज मोठा बदल झाला आहे. बस्तर ऑलम्पिकचे आयोजन तिथल्या तरुणांनी केले आहे. हजारो तरुण त्यामध्ये सहभागी झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.