जपानमध्ये एका 38 वर्षांच्या तरुणाला फूड डिलिव्हरी कंपनीच्या फसवणूक प्रकरणात नुकतंच अटक करण्यात आली आहे, तब्बल 21 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप या तरुणावर आहे. या तरुणाने फूड डिलिव्हरी कंपनीच्या अॅपमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेत या कंपनीची तब्बल 24 हजार डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 21 लाख रुपयांची फसवणूक केली आहे, त्याने गेल्या दोन वर्षांमध्ये एकाच कंपनीकडून तब्बल 1 हजार 95 वेळा जेवणाची ऑडर मागवली, मात्र त्या बदल्यात त्याने या कंपनीला एकही रुपया दिला नाही.
जपान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार जपानमधील आइची प्रांतामध्ये असलेल्या नागोया शहरातील पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे, फूड डिलिव्हरी कंपनीकडून फ्रीमध्ये जेवण ऑर्डर करणे, पैसे वाचवण्यसाठी कंपनीच्या अॅपमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन कंपनीची फसवणूक करणे अशा विविध आरोपांखाली या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण सर्वात आधी या कंपनीला जेवणाची ऑर्डर द्यायचा, त्यानंतर कंपनीकडून आलेली ही ऑर्डर स्विकारायचा, मात्र त्यानंतर तो कंपनीकडून रिफंड देखील मिळवायचा. यासाठी तो एक खास ट्रीक वापरायचा. तो या कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन कॉटॅक्टलेस डिलिव्हरीचा ऑप्शन निवडायचा, त्यानंतर पु्न्हा या कंपनीच्या अॅपवर जाऊन रिफंडसाठी तक्रार दाखल करायचा, त्यामुळे या तरुणाला जेवणही मिळत होतं आणि त्याचे पैसे देखील त्याला परत मिळत होते.
त्याने तीन जुलैला यासाठी आणखी एक नवं जुगाड शोधून काढलं, त्याने या कंपनीच्या अॅपवर जाऊन एक बनावट अकाऊंट तयार केलं आणि आइस्क्रिमची ऑर्डर दिली, त्यानंतर डिलिव्हरी मिळाल्यानंतर हा तरुण पुन्हा एकदा कंपनीच्या अॅपवर गेला आणि तिथे त्याने तक्रार दिली की त्याचं पार्सल त्याला मिळालंच नाही, त्यानतंर कंपनीने त्याला 16,000 येन 105 डॉलर रिफंड म्हणून दिले, या तरुणाने अशाप्रकारे तब्बल दोन वर्षांमध्ये 124 बनावट खाते या कंपनीच्या अॅपवर तयार केल्याचं समोर आलं आहे. अखेर या तरुणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार होता, तो याच पद्धतीने आपल्या जेवणाची व्यवस्था करत होता. त्याने आतापर्यंत या कंपनीकडून तब्बल 21 लाख रुपयांची फूड फ्रिमध्ये ऑडर केलं आहे, त्याची ही पद्धत पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.