आळंदीत 'दिवाळी पहाट' संगीत महोत्सवाचा प्रारंभ
esakal October 19, 2025 07:45 AM

आळंदी, ता. १८ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी देवस्थानच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट संगीत महोत्सव २०२५’ चा शुक्रवारी (ता. १७) प्रारंभ झाला. सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत पहिल्या दिवशी शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या मैफलीला चांगली दाद मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. रोहिणी पवार, डॉ भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ज्ञानेश्वर वीर, डॉ. नारायण महाराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. भाटे यांना हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर यांनी तबल्यावर प्रशांत पांडव आणि प्रसाद जोशी यांनी, तसेच पखवाजावर श्रेयस बडवे यांनी साथ केली.
दिवाळी पहाट संगीत महोत्सवात पुढील पाच दिवस (१९ ते २३ ऑक्टोबर) संगीत आणि कलेतील विविध क्षेत्रातील दिग्गज कलावंत कला सादर करणार आहेत.
शनिवारी (ता. १८) मयूर महाजन आणि राधिका जोशी यांची गायन सेवा झाली. रविवारी (ता. १९) पंडित यादवराज फड यांची गायन सेवा, सोमवारी (ता. २०) पंडित हेमंत पेंडसे यांची मैफल, मंगळवारी (ता. २१) पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन, बुधवार (ता. २२) बलिप्रतिपदा/दिवाळी पाडवा दिवशी चैतन्य देवढे आणि अश्विनी मीठे यांची गायन सेवा होणार आहे. भाऊबिजेच्या दिवशी गुरुवारी (ता. २३) दिवाळी पहाट संगीत महोत्सवाचा समारोप मुंबईच्या भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.