IND vs AUS : 2 मालिका आणि 8 सामने, एका क्लिकवर पाहा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक
GH News October 19, 2025 01:11 AM

आशिया कप 2025 स्पर्धेत टी 20I, वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यांनंतर टीम इंडिया आता पुढील काही दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भिडणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ते 25 ऑक्टोबरपर्यंत एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. शुबमन गिल या मालिकेपासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर त्यानंतर टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I मालिका खेळणार आहे. ही मालिका 5 सामन्यांची असणार आहे. या निमित्ताने भारतीय वेळेनुसार एकदिवसीय आणि टी 20I मालिकेतील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

दोघे आऊट, कॅप्टन बदलला

ऑस्ट्रेलिया या एकदिवसीय मालिकेत नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन यांच्याशिवाय खेळणार आहे. पॅट आणि कॅमरुन या दोघांनाही दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. पॅटच्या अनुपस्थितीत मिचेल मार्शचं एकदिवसीय आणि टी 20i सीरिजमध्ये कांगारुंचं नेतृत्व करणार आहे. तर कॅमरुनला साधारण दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. आगामी एशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर कॅमरुनच्या दुखापतीत वाढ होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून त्याला बाहेर केलं आहे. तर ग्रीनचा मार्नस लबुशेन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 19 ऑक्टोबर, पर्थ

दुसरा सामना, 23 ऑक्टोबर, एडलेड

तिसरा सामना, 25 ऑक्टोबर, सिडनी

उभयसंघातील तिन्ही एकदिवसीय सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस केला जाणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 54 सामने खेळले आहेत. भारताला या 54 मधून 18 सामनेच जिंकता आले आहेत. तर 38 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. भारताने 2019 साली ऑस्ट्रेलियात अखेरची मालिका ही 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

वनडेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान हे 5 सामने होणार आहेत. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होणार आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 29 ऑक्टोबर, कॅनबेरा.

दुसरा सामना, 31 ऑक्टोबर, मेलबर्न.

तिसरा सामना, 2 नोव्हेंबर, होबार्ट.

चौथा सामना, 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट.

पाचवा सामना, 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.