पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : कांचनगंगेच्या कुशीत
लेखक : डॉ. संदीप श्रोत्री
प्रकाशक : हेड्विग मीडिया हाऊस
पृष्ठे : २२० मूल्य : ४५० रुपये
ऊर्जास्त्रोतांचा साठा किंवा उगम असा अर्थ असलेल्या ‘कांग-चेन-झोन्गा’ या तिबेटी नावाला आपण ‘कांचनगंगा’, ‘खान्ग्चेनझोंगा’,
‘कांगचेनजुंगा’ अशा विविध नावांनी ओळखतो. कांचनगंगा शिखर आणि त्याच्या आसपासचा भूभाग म्हणजे महाभारताच्या काळातील किरात राज्यांचा प्रदेश. निसर्गत्त देणगी लाभलेल्या या परिसराचे सौंदर्य नजरेत न मावणारे. अशाच ‘कांचनगंगा’ शिखराच्या पायथ्याशी केलेल्या मनसोक्त भटकंती आणि अभ्यासपूर्ण नोंदींचे दर्शन आपल्याला डॉ. संदीप श्रोत्री यांचे ‘कांचनगंगेच्या कुशीत’ हे पुस्तक घडवते.
जगातील तिसरे सर्वोच्च शिखर म्हणून कांचनगंगा शिखराला लौकिक मिळाला असून, ही पर्वतरांगही विस्तीर्ण भूभागात पसरली आहे. या भागांत केलेल्या दोन महत्त्वाच्या ‘ट्रेक’ची दैनंदिनी स्वरूपातील नोंद म्हणजे हे पुस्तक. पहिल्या भागात सिक्कीममधून केलेला ‘गोयचा ला’ ट्रेकचा समावेश आहे, तर दुसऱ्या भागांत नेपाळमधून तापलेजंग ते पांगपेमा उत्तर आणि दक्षिण बेस कॅम्पचा ट्रेक समाविष्ट आहे. हे दोन ट्रेक करण्याची प्रेरणा लेखकाला कशी मिळाली आणि या हिमशिखरांनी लेखकाला कसे आकर्षित केले, त्याची गोष्ट मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
सन २०१५ पासून सात वेळा कांचगंगेच्या परिसरातील विविध ट्रेक लेखकाने केले असून, या गिर्यारोहणादरम्यान अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. दऱ्यांमागून दऱ्या ओलांडल्या, जंगलात अनेकदा ते वाटही चुकले, असंख्य प्राणी-पक्षी आणि अन्य निसर्गाची नवलाईही लेखकाच्या वाट्याला आली. हे सारे वर्णन हे पुस्तक करते. सलग मोठी प्रकरणे न मांडता दैनंदिनी स्वरूपातील छोटी छोटी प्रकरणे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. एक प्रकरण संपताना आता पुढे काय घडले असेल, अशी वाचकाला उत्सुकता लागून राहते, हे लेखकाचे कौशल्य! हे सारे लिखाण तांत्रिकतेच्या किंवा फक्त माहितीपर मार्गावर जाणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे.
प्रत्येक लेखामध्ये, रोजच्या नोंदींमध्येही विविध ठिकाणी कविता, साहित्यिक संदर्भांचा वापर केला आहे. याशिवाय त्या निमित्ताने संबंधित ठिकाणाची अतिरिक्त माहितीही दिली आहे. चार मुख्य आणि १२५ पेक्षा जास्त हिमनद्या या परिसरामध्ये उगम पावतात, तसेच या भागातील ट्रेक करताना सर्व प्रकारचे साह्य करणाऱ्या शेर्पांचे वैयक्तिक आयुष्य अशी विविध प्रासंगिक माहितीही लेखक देत राहतो. नेपाळमधून ‘बेस कॅम्प’चा ट्रेक करीत असताना पार केलेली खडतर पाऊलवाट, ‘अम्ज्लीलोसा’, ‘ग्यापला’, ‘घुंसा’ या गावांची केलेली वर्णने अतिशय जिवंत अनुभव देतात.
Premium| Author Vishwas Patil: मराठीतील थोर लेखक 'ज्ञानपीठ' पुरस्कारापासून कंपूशाहीमुळे वंचित?हे गिर्यारोहण करताना ज्या भागात लेखक प्रवास करतो, तेथील विविधरंगी पक्ष्यांचे विश्व कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लेखकाने केलेले अनेक उद्योग हा भागही रंजक झाला आहे. लेखकाने स्वतः काढलेली अतिशय बोलकी अशी छायाचित्रे हे पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य. मात्र, ती मजकुरासोबत हवी होती. पुस्तक वाचतानात्यातील वर्णन शेजारील किंवा पुढील पानावरील छायाचित्रात देणे आवश्यक होते. फेवा आणि हेवा या दोन नद्यांच्या वर्णनामध्ये ‘मला खरोखर या परिसराचा हेवा वाटला,’ अशा शाब्दिक कोट्या टाळायला हव्या होत्या, असे जाणवते. हे दोन्ही ट्रेक भविष्यात करणाऱ्यांसाठी आवश्यक दोन परिशिष्टे पुस्तकाची उपयुक्तता आणखी वाढवितात. एकूणच, ‘कांचनगंगे’ची ही सफर रम्य आणि वाचनीय आहे, हे मात्र खरं!