दिवाळी सुट्टीत गावाकडे कूच
पनवेलमधील रेल्वे, बसस्थानके गर्दीने फुलली
नवीन पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः दिवाळीत अनेकांनी गावाकडे जाण्याचे बेत आखले आहेत. त्यामुळे रेल्वे, बसस्थानके गर्दीने फुलली आहेत.
पनवेल बसस्थानक, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मॅकडोनाल्ड हॉटेल येथे गावी निघालेल्या सकाळपासूनच गर्दी आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल या परिसरात चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. सत्र परीक्षा संपून शाळांना दिवाळीची सुट्टी लागली आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून बस, रेल्वेस्थानकांवर गर्दी होत आहे. एसटी तसेच खासगी वाहनाने राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सकाळपासून विविध मार्गांवर जाणाऱ्यांची गर्दी होते.
मुलांच्या शाळांना सुट्टी पडली असल्याने दरवर्षीप्रमाणे रत्नागिरीला पनवेल बसस्थानकावरून एसटीने निघालो असल्याचे प्रसाद सावंत यांनी सांगितले.