-rat१८p९.jpg-
२५N९९३६६
चिपळूण ः ग्रांगईत दिसलेला बिबट्यांचा हा कळप एआय तंत्रज्ञानाने बनवल्याचे स्पष्ट झाले.
------
गांग्रईतील बिबट्यांचा ‘एआय खेळ’ उघड
वनविभागाने दिले स्पष्टीकरण ; चुकीची माहिती पसरवण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : तालुक्यातील गांग्रई परिसरात चार बिबट्यांचा कळप मुक्तसंचार करत असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने पसरले आणि एकच खळबळ उडाली; मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बिबट्याचे छायाचित्र प्रसारित झाल्याचे समोर आले आणि अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गेल्या आठ दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर गांग्रई येथे चार बिबट्यांचा कळप दिसला, असा दावा करणारे व्हिडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात होते. प्रत्यक्षात मात्र ते छायाचित्र एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आले असून, परिसरातील नागरिक आणि वनविभागाकडे बिबट्या दिसल्याची कोणतीही नोंद नाही.
चिपळूण तालुक्यात बिबटे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी निर्व्हाळ येथे दुचाकीने जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला. कळंबट येथे मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. शिरगाव तळसर येथील जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व समोर आले आहे. याचा गैरफायदा घेत गांग्रई गावच्या रस्त्यावर चार बिबट्यांचा कळप मुक्त संचार करत असल्याचा व्हिडिओ टाकण्यात आला. वनविभागापर्यंत याची माहिती भेटल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी ग्रामस्थांकडे चौकशी केली असता हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा; मात्र समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नये, असे आवाहन खान यांनी केले.
---
चौकट
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने बनावट छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत तयार करणे अतिशय सोपे झाले असून, त्यामुळे खोटी माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीबरोबरच सायबर तपासणी अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
--सर्वर खान, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण