माणूसकीच्या भिंतीचा समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळेल
esakal October 19, 2025 09:45 AM

माणुसकीच्या भिंतीचा गरजू घटकांना आधार ः आयुक्त
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) ः माणुसकीची भिंत आणि निरुपयोगी वस्तू संकलन या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळेल, असे प्रतिपादन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. कल्याण-डोंबिवली पालिका, सहयोग सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ टाइगर यांच्या संयुक्त प्रयत्नातून माणुसकीची भिंत व निरुपयोगी वस्तू संकलन या उपक्रमांचे उद्घाटन आयुक्त अभिनव गोयल व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे माणुसकीची भिंत उभारावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले, रोटरी क्लब ऑफ टाइगरचे अध्यक्ष भूषण कोठावदे, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, जाणीव सामाजिक संस्थेच्या अनिता पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या वापरात नसलेल्या वस्तू समाजातील गरजूंपर्यत पोहचविण्याची एक सामाजिक चळवळ सुरु झाली आहे. नागरीकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.