Crime News : रावेर पोलिसांची कामगिरी: मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थानमधून अपहरण झालेल्या ५ अल्पवयीन मुलींची सुटका!
esakal October 19, 2025 09:45 AM

रावेर: तालुक्यातील विविध गावांमधून अपहरण केलेल्या पाच अल्पवयीन मुलींची विविध राज्यांतून सुटका करून रावेर पोलिसांनी त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे स्वाधिन केले.

यामुळे पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील विविध गावांतील अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याबाबतचे पाच गुन्हे रावेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तपासासाठी रावेर पोलिस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार केली होती.

या पथकांनी आपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेत राज्याच्या बाहेर जाऊन दोन मध्य प्रदेशात, दोन ओडिसा व एक राजस्थानात अशा पाच मुलींचा शोध लावण्यात यश मिळविले. यामधील ३१ मार्च २०२५ला दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्यातील अल्पवयीन मुलींचा खकनार (मध्य प्रदेश), ६ व ७ एप्रिल २०२५च्या फिर्यादमधील गुन्ह्यांतील दोन अल्पवयीन मुलींचा मकापादरा गाव (ओडीसा), १५ सप्टेंबरच्या फिर्यादीनुसार दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलीचा डमरिया (ता. महु जि. इंदौर (मध्य प्रदेश), तर दुसऱ्या अल्पवयीन मुलींचा ग्राम बकानी (ता. जि. झालावाड, राजस्थान) अशा पाच मुलींचा शोध लावून त्यांची सुखरूप सुटका केली.

Mumbai Traffic: दिवाळीच्या उत्साहाने मुंबईत कोंडीचे विघ्न, प्रवाशांचा संताप

सर्वांना त्यांच्या आईवडिलांचे स्वाधिन करण्यात आले. या कारवाईबाबत रावेर पोलिसांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, या शोधपथकात पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिरा देखमुख, उपनिरीक्षक मनोज महाजन, उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार सुनील वंजारी, संभाजी बिजागरे, अतुल गाडीलोहार, विक्रम सिसोदे, पुजा साळी यांचा समावेश होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.