ऑक्टोबर हिटने पालेभाजीला भाव
घाऊक बाजारात दहा रुपयांची जुडी ४० रुपयांवर
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः भाजीपाल्याच्या उत्पादनावर ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला आहे. फळभाज्या किरकोळ बाजारात ८०-१५० रुपये प्रतिकिलो झाल्या आहेत. तर १० रुपयांच्या पालेभाजीच्या जुडीसाठी आता ४० रुपये मोजावे लागत आहेत.
नवरात्रीमध्ये अनेक जण मांसाहार बंद करीत असल्याने भाज्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे मागणी वाढल्याने भावही वाढले होते. नवरात्रीनंतर भाव कमी होतील, अशी अपेक्षा होती; मात्र भाज्यांचे भाव जैसे थे आहेत. अशातच आता ऑक्टोबर हिट जाणवत आहे. तर पावसाने विश्रांती घेतल्याने भाज्यांच्या मळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने भाज्या करपू लागल्या आहेत. त्यामुळे अधिकचा भाव व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. घाऊक बाजारात फळभाज्या ६०-१०० रुपये प्रतिकिलो आहेत. तर किरकोळ बाजारात भाव १२०-१५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
----------------------
विक्रेत्यांकडून भाववाढ
बहुतांश भाजीविक्रेत्यांकडे पालेभाज्या उपलब्ध नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्याचे भाव चाळिशीपार गेले आहेत. मेथी, पालक, माठ, कांदापात, मुळा, शेपूची जुडी १० रुपयांवरून थेट ४० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे किरकोळ भाजीविक्रेते आणखीनच भाव वाढवून विक्री करीत आहेत.
------------------------
थंडीपर्यंत भाव चढेच
जेवणाची चव वाढवणाऱ्या कोथिंबिरीचे भावही वाढले आहेत. कोथिंबिरीची दहा रुपयांना मिळणारी एक जुडी ५० रुपये झाली आहे. थंडीचा काळ सुरू होईपर्यंत भाज्यांचे, पालेभाज्यांचे भाव चढेच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.