शहापूर, ता. १८ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेईई-नीट प्रवेश परीक्षेबाबत खासगी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील वैद्यकीय आणि आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकणार आहे. त्याचे वर्ग शहापूर प्रकल्प कार्यालयाच्या कक्षेतील भिवंडी तालुक्यातील पिसे आश्रमशाळेत भरविले जाणार आहेत.
फिजिक्सवाला या खासगी कोचिंग क्लासेस संस्थेसोबत आदिवासी विकास विभागाच्या वतीने सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची जेईई-नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विषयांचे धडे देण्यात येणार आहेत. ठाणे येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून ८० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विद्यार्थी निवडीसाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. जेईई आणि नीट परीक्षेसाठी १६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात त्यांच्या अभ्यासाबरोबरच चाचणी परीक्षा आणि मॉक टेस्टसाठी मार्गदर्शन करणे याचाही समावेश आहे. शहापूर प्रकल्पाच्या पिसे शासकीय आश्रमशाळेच्या केंद्रात मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा
फिजिक्सवाला कोचिंग क्लासेसतर्फे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आता मोफत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये धडे दिले जाणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल. फिजिक्सवालामुळे जेईई-नीट यांसारख्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे होणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे.