Sanjay Nirupam: संजय निरुपम यांचं राज ठाकरेंना थेट आव्हान! 94 लाख मतदारांना...करुनच दाखवा
Sarkarnama October 21, 2025 01:45 PM

Sanjay Nirupam: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा मांडल्यानंतर संपूर्ण देशभरात आता मतदार याद्यांमधील गडबड घोटाळ्यांवर चर्चा व्हायला लागल्या आहेत. महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील मतचोरीचा मुद्दा लावून धरला आहे. राज्यात ९४ लाख मतदार बनावट असल्याचा आरोप त्यांनी नुकताच एका जाहीर भाषणात केला होता. त्यांच्या या विधानावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी त्यांना थेट आव्हान दिलं आहे.

निरुपम म्हणाले, "मी मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान देतो की, आपण ज्या ९४ लाख तथाकथित फेक मतदारांची गोष्ट करत आहात. त्यांची संपूर्ण यादी सार्वजनिक करुन टाका. आता ते जे काही करत आहेत ती केवळ हवाबाजी सुरु आहे. विरोधीपक्षांना आता हा नवा छंद त्यांना चढला आहे. निवडणूक हारण्यापूर्वी मतचोरीचा बहाणा किंवा मतदार याद्यांमध्ये गडबडी आहेत हे सांगत सगळा तमाशा उभा करायचा. त्यानंतर निवडणूक हारल्यानंतर त्या पराभवाचं खापत इतर कोणावर तरी फोडायचं. जवळपास साडेनऊ कोटी मतदार आहेत महाराष्ट्रात यामध्ये एक ते सव्वा लाखांच्या आसपास जी मतदानं केंद्रे आहेत आपल्याकडं तिथं एवढ्या मोठ्या मतदार याद्यांच्या ढिगाऱ्यातून जर ९४ लाख तुम्ही सांगितल्याप्रमाणं खरोखरच शोधून काढले असतील तर नक्कीच खूपच मोठी गोष्ट आहे. पण असं काहीही शोधकार्य न करता कोणीही व्यक्ती उभं राहतं आणि बनावट आकडे लोकांसमोर ठेवून देतात, एकतर हा एक विषय आहे.

Raj Thackeray : लोकसभेला नारायण राणेंना पाठिंबा दिलेल्या राज ठाकरेंवर नितेश राणेंना शंका; आता कोकणात जाऊन मतदार याद्या तपासण्याची मनसेची घोषणा

दुसरा विषय म्हणजे, जेव्हा बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी आयोग एसआयआरची प्रक्रिया सुरु करणार होता. तेव्हा विरोधीपक्षांनी सांगितलं की, आमच्या मतदारांना काढलं जात आहे. आमच्या मतदारांची नावं डिलिट केली जात आहेत. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले त्यात सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केल्यानंतर ६० ते ६५ लाख बनावट मतदार होते, त्यांची नाव काढली. इथं महाराष्ट्रातही जर बनावट मतदार असतील तर त्याविरोधात कारवाई व्हायला पाहिजे पण यामध्ये बनावट मतदार कोण आहेत? याची ठोस माहिती कोणाला तरी द्यावी लागेल. की ही केवळ हवाबाजी सुरु आहे यानं काय होणार आहे?

जर कुठला मतदार बनावट पद्धतीनं यादीत नोंदवला गेला असेल आणि त्याविरोधात जर कोणी तक्रार केली तर त्याचं नाव यादीतून हटवावं लागेल. त्यामुळं राज ठाकरेंनी इतकं तिकडं सभांमध्ये जाऊन बडबड करण्यापेक्षा थेट निवडणूक आयोगाकडं जावं आणि ९६ लाख मतदारांची यादी त्यांच्या समोर ठेवावी आणि यांना यादीतून हटवा असं सांगावं, अशा शब्दांत निरुपम यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.