देहूरोड, ता. २० ः देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील किन्हई ते देहूरोड या ठिकाणी झिरपणारे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी सिमेंट काँक्रिटीकरण तर देहूरोड आणि किन्हई परिसरात डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याने रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच या रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेले गवत यामुळे रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना जंगली प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने पथदिवे बसवावेत आणि वाढलेले गवत काढावे, अशी मागणी अजित पिंजण यांनी केली आहे.