जळगाव: शहरातून जाणाऱ्या महामार्गाची बिकट अवस्था झाली आहे. खोटेनगर ते कालिका माता चौकापर्यंतच्या सात किलोमीटरच्या टप्प्यात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात घडत असून, महामार्गावरुन धूळही उडत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पावसाळ्यानंतर महामार्गाची दुरुस्ती करण्यासंदर्भात कळविण्यात आले. मात्र, पावसाळा संपून दोन- तीन आठवडे उलटले, तरीही दुरुस्ती न झाल्याने जळगावकरांची दिवाळी महामार्गांवरील खड्ड्यांमध्येच जाणार आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गावखेड्यातील मार्ग, शेतरस्त्यापेक्षाही बिकट झाली आहे. शहरातून दररोज हजारोंच्या संख्येने वाहने या महामार्गावरून ये- जा करतात. प्रामुख्याने शहरातील नोकरदार, विद्यार्थी वर्ग शहराच्या दोन्ही पूर्व व पश्चिम भागाकडे या मार्गावरून प्रवास करीत असतो. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात वाहने याच महामार्गावरून वापरतात. असे असताना या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीबाबत महामार्ग प्राधिकरण (न्हाई) गंभीर नाही.
मुळात महामार्गाचेच काम निकृष्ट
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात क्रमांक ५३ चा हा मार्ग जळगावला वळसा घालून पाळधी ते तरसोद फाटा असा बायपास गेल्याने शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न करावे लागले. कोरोना काळात या मार्गावर खोटेनगर ते कालिंकामाता चौक या अवघ्या ७ किलोमीटरच्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले.
दोन वर्षांत हे काम झांडू कन्स्ट्रक्शन नामक एजन्सीने कसेबसे पूर्ण केले. रस्त्याच्या कामासाठी बनविण्यात आलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) व त्यानुसार केलेल्या कामावर सुरवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातच या कामाचा दर्जा व गुणवत्ताही राखण्यात आली नाही. त्यामुळे तयार झाल्यानंतर वर्षभरात रस्त्याची दुरवस्था झाली.
निर्ढावलेली मक्तेदार एजन्सी
ज्या मक्तेदार एजन्सीने या महामार्गाचे काम केले ती निर्ढावलेली आहे. दोष दायित्व कालावधीत या एजन्सीने रस्त्याची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थिपणे केली नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जिल्हा नियोजन समिती व रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकांमधून त्यावर ताशेरे ओढण्यात आले. मात्र, तरीही दुरवस्था झालेल्या महामार्गाची दुरुस्ती योग्य पद्धतीने झालेली नाही.
आता पावसाळ्यात या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालीय. ‘न्हाई’चे नव्यानेच नियुक्त झालेले प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे यांनी पावसाळ्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे ‘सकाळ’ला सांगितले होते. मात्र, त्यानंतर दोन- तीन आठवडे उलटूनही रस्त्याची दुरुस्ती झालेलीच नाही.
Karad Crime: सैदापूर, कोयना वसाहतीमधून साडेसहा लाखांचे दागिने लंपास; पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदचौकाचौकांत खड्ड्यांमुळे धूळ
महामार्गावर ज्या ठिकाणी चौक आणि सेवारस्ता जोडलेला आहे, अशा ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अग्रवाल चौक ते प्रभात चौकापर्यंतच्या उड्डाणपुलावरही खड्डे असून, त्यामुळे वाहनधारकांची अडचण होते. आकाशवाणी चौकात खड्ड्यांमुळे रस्ता उखडला आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडते. मोठे वाहन, एसटी किंवा ट्रक, डंपर या चौकातून वेगाने गेल्यास संपूर्ण परिसर धूळमय होतो.