ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताची निराशाजनक कामगिरी राहिली . रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही फेल गेले. इतकंच काय तर कर्णधार शुबमन गिलही काही खास करू शकला नाही. त्यात पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे सामना वारंवार थांबवण्याची वेळ आली. त्यामुळे हा सामना फक्त 26 षटकांचा झाला. या सामन्यात भारताने 26 षटकात 9 गडी गमवून 136 धावा केल्या. मात्र असं असूनही ऑस्ट्रेलियासमोर फक्त 131 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 व्या षटकात 3 गडी गमवून षटकात पूर्ण केलं. पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. खरं तर विजयासाठी 136 धावांचं आव्हान असायला हवं होतं. मग 5 धावा गेल्या कुठे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. चला जाणून घेऊयात नेमकं काय गणित ते…
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने संपूर्ण सामन्याची खऱ्या अर्थाने मजा निघून गेली. पहिल्यांदा हा सामना 35 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्यात 3 षटकं कमी करून 32 षटकांपर्यंत खेळ आणला गेला. मात्र पाऊस पुन्हा आणि आणखी सहा षटकं घेऊन गेला. त्यामुळे हा सामना शेवटी 26 षटकांचा करण्याची वेळ आली. षटकं कमी झाली की आयसीसीच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट रिव्हर्स करून देण्यात आलं. हा नियम पहिल्यांदा 1997 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्ह स्टर्न यांनी 2015 वर्ल्डकपपूर्वी यात काही बदल केले. त्यामुळे या नियमाला डकवर्थ लुईस स्टर्न असं नाव देण्यात आलं.
डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यात पावसामुळे खंड पडला तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला टार्गेट निश्चित करून दिलं जातं. कधी हे टार्गेट जास्त होतं, तर कधी कमी होतं. टार्गेट निश्चित करून देण्यासाठी काही गोष्टींची चाचपणी केली जाते. जसं की प्रथम फलंदाजी करणाऱ्या किती विकेट गमावल्या आणि त्यांनी किती धावा केल्या होत्या? किती षटकांचा खेळ झाला यावरून टार्गेट सेट केलं जातं.