चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर म्हणजेच 7 महिन्यानंतर रोहित शर्मा मैदानात उतरला. यावेळी त्याची शरीरयष्टी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रोहित शर्मा बारीक झाल्याचं पाहायला मिळालं. पोटही आत गेलं होतं. इतका बदल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने फिटनेस ठेवत असल्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी 10 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी त्याने 252 तास मेहनत घेतली होती. त्याचा परिणाम आता दिसून आला आहे. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माने वजन कमी कसं केलं? 252 तास त्याने नेमकं काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तर रोहित शर्माला ट्रेन करण्यात योगदान असलेल्या व्यक्तीने दिले आहेत. रोहित शर्माचा जवळचा मित्र आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक नायर आहे आणि त्यानेच या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
अभिषेक नायरने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीत सांगितलं की, रोहित शर्माने एक दोन नाही तर 10 किलो वजन कमी केले आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी रोहित शर्माने अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सरावही केला. अभिषेक शर्माने सांगितलं की, रोहित शर्माने तीन महिन्यात 10 किलो वजन कमी केले. रोहित शर्माने 12 आठवड्यांच्या प्रशिक्षणापैकी आठ आठवडे कठोर प्रशिक्षणासाठी घालवले. तर चार आठवडे त्याने फलंदाजीचं कौशल्य आणि इतर पैलूंच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं. पहिल्या आठ आठवड्यांपैकी पहिले पाच आठवडे हे बॉडी बिल्डिंग माइंडसेवर घालवले. यात त्याने फक्त शरीरावर काम केलं.
रोहित शर्माने तीन महिन्यांच्या कालावधीत रोज 3 तास घाम गाळला. यात त्याने खूप मेहनत केली. म्हणजेच रोज तीन तास म्हणजेच आठवड्याला 21 तास काम केलं. हे गणित 12 आठवड्यांचा जोडलं तर त्याने 252 तास पूर्ण मेहनत घेतली. रोहित शर्मा आता फिट तर दिसत आहे. पण त्याला फलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्याच सामन्यात अवघ्या 8 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्याकडून आता दुसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.