फटाक्यांच्या धुराने वाढतील श्वसनाचे विकार
धुराचे फटाके न वाजवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दिवाळीचा आनंद लुटताना फटाक्यांच्या धुरामुळे दमा, अस्थमा आणि फायब्रोसिस झालेल्या रुग्णांच्या श्वसनाच्या आजारात भर पडू शकते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना इतरांच्या आरोग्याचाही विचार करा आणि धुराचे फटाके उडवणे टाळा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दिवाळीचा काळ तसा आरोग्यदायी असला तरी फटाक्यांतून निघणारा घातक धूर फुप्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरतो.
दिवाळीची चाहूल लागली की घरांची साफसफाई करताना उडालेल्या धुळीमुळेही श्वसन रोग बळावू शकतात. अशावेळी सर्दी-खोकला वाढतो, दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास होऊ शकतो. या सर्वांमुळे वातावरणातील धूलिकण वाढतात आणि त्यामुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होतो, असे जे. जे. रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. प्रीती मेश्राम यांनी सांगितले. याशिवाय लहान मुलांसह मोठी मंडळीही दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. फटाक्यांमधून निर्माण झालेल्या धुरामुळे या काळात श्वसन विकाराच्या तक्रारी वाढतात. त्याचसोबत घसा खवखवणे, डोळ्यात पाणी येणे, कानात बधिरता येणे, अंगावर खाज येणे अशी लक्षणे फटाके फोडल्यानंतर दिसतात.
फटाक्यांचा धूर आणि आवाज हे दोन्ही शरीरासाठी हानिकारक असतात. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकदा कानाचे पडदे फाटतात, डोळ्यांत धूर जाऊन डोळ्यांचे नुकसान होते, तर त्वचेवर खाज आणि जळजळ होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
फटाक्यांमधून निघणारे उष्ण कण हवेत उंच उडतात आणि ते दुसऱ्यांच्या अंगावर किंवा डोक्यावर पडू शकतात. त्यामुळे उघड्या जागेत, मोकळ्या मैदानात आणि वाऱ्याची दिशा नियंत्रण असलेल्या ठिकाणीच फटाके उडवावेत. फटाके वाजवताना ज्वालाग्राही वस्तूंपासून दूर राहावे आणि शक्य असल्यास पाण्याची सोय जवळ ठेवावी. जोरात आवाज करणारे फटाके टाळावेत, असे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची काळजी
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा श्वसन यंत्र नाजूक असते. त्यामुळे त्यांना धुराचा आणि आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. त्यांनी फटाक्यांच्या जवळ न जाता घरात राहावे, शक्य असल्यास मास्क व चष्मा वापरावा आणि फटाक्यांच्या वेळी खिडक्या-दारे बंद ठेवावीत. लहान मुलांनी मोठ्या फटाक्यांपासून अंतर राखावे. नवजात बालके असतील तर त्यांना आवाजाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी खोलीतील दरवाजे बंद ठेवावे, असे डॉक्टरांनी सांगितले.
फटाके हातात धरून किंवा शरीराच्या जवळ उडवू नयेत. त्यामुळे हात, चेहरा किंवा शरीरावर गंभीर भाजल्या जाण्याच्या घटना घडतात. काही वेळा या जखमा जन्मभर राहतात किंवा शारीरिक अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे भाजल्यावर थंड पाण्याने जखम धुवून त्यावर मलमट्टी करावी व तातडीने डॉक्टरांकडे जावे.
- डॉ. प्रल्हाद राठोड,
त्वचाविकारतज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय
फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रस ऑक्साइडसह अन्य विषारी घटक असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा आणि सीओपीडीचा धोका वाढतो. फुप्फुस व श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी धुरापासून दूर राहावे आणि सतत मास्क वापरावा.
- डॉ. अविनाश सुपे,
माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
वायू प्रदूषणामुळे वाढणारे आजार
सीओपीडी, दम्याचे विकार, लहान मुलांमधील श्वसन समस्या, फुप्फुसाचे विकार, श्वसनाचे विकार.