इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामा क्राइस्टचर्च मैदानात खेळला गेला. या सामन्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. इंग्लंडने या सामन्यात न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. इंग्लंडने हा सामना 65 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्लंडने 20 षटकात 4 गडी गमवून 236 धावा केल्या आणि विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 18 षटकात सर्व गडी गमवन 171 धावांवर बाद झाला. या सामन्यात इंग्लंडने 65 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. खासकरून या दोन्ही संगांनी मिळून या सामन्यात 407 धावा केल्या . या दोन्ही संघातील टी20 सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे.
इंग्लंडकडून सलामीला आलेल्या फिल सॉल्टने न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या जखमेवर मीठ चोळलं. त्याने 56 चेंडूत 85 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. तर कर्णधार हॅरी ब्रूकने फक्त 35 चेंडूत 78 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि पाच षटकार होते. दुसरीकडे, टॉम बँटनने 29, तर जॅकब बेथेलने 24 धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: सोलून काढलं. काइल जॅमीसनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. पण यासाठी त्याने 4 षटकात 47 धावा दिल्या. जॅकब डफी आणि मायकल ब्रेसवेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. या गोलंदाजांनीह 10 पेक्षा जास्तीच्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.
इंग्लंडने दिलेल्या 237 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 18 षटकंच खेळू शकला. सर्व गडी गमवत न्यूझीलंडने 171 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. मिचेल सँटनरने 36 धावा केल्या. या शिवाय एकही फलंदाजी 30 धावांचा आकडा गाठू शकला नाही. मार्क चॅम्पमनने 28 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशीद सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 32 धावा देत 4 गडी बाद केले. तर ल्यूक वूड, ब्रायडन कार्से आणि लियाम डॉसनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.